भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेची चर्चा आतापासूनच रंगली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यानं या मालिकेबद्दल एक मोठं भाकित केलं. पाँटिंगनं मालिकेत कोणते दोन खेळाडू सर्वाधिक धावा करतील हे सांगितलं आहे. पाँटिंगनं यासाठी एका भारतीय आणि एका ऑस्ट्रेलियन खेळाडूची निवड केली.
रिकी पाँटिंग म्हणाला, “2024-25 बॉर्डर गावस्कर मालिकेत रिषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ सर्वाधिक धावा करणारे खेळाडू असू शकतात. पंतला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा मोठा अनुभव आहे. तर स्टीव्ह स्मिथ आधीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू आहे. त्याला येथील परिस्थिती चांगली माहित आहे.”
पाँटिंग म्हणाला, “मला वाटतं की स्मिथ सलामीवीराच्या स्थानावरून चौथ्या क्रमांकावर परतला आहे. कदाचित त्याला आणखी काही सिद्ध करायचं आहे. चौथ्या क्रमांकावर तो आपलं सर्वोत्तम देऊ शकतो हे त्याला सिद्ध करावं लागेल. दुसरीकडे, रिषभ पंत संघात पुनरागमन करतोय. तो शक्यतो मधल्या फळीत फलंदाजी करतो, जेव्हा चेंडूची चमक आणि कडकपणा थोडा कमी होतो. तो ज्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे मी त्याला आघाडीचा धावा करणारा खेळाडू म्हणून निवडलं.”
याशिवाय रिकी पाँटिंग यानं ही मालिका कोण जिंकणार हेही सांगितलं. त्यानं हे आधीच भाकीत केले होतं आणि तो अजूनही यावर ठाम आहे. ऑस्ट्रेलिया ही 5 सामन्यांची कसोटी मालिका 3-1 ने जिंकेल, असं पाँटिंगनं म्हटलं आहे.
भारताच्या गोलंदाजीबद्दल बोलताना पाँटिंग म्हणाला, “मोहम्मद शमीमुळे त्यांच्या गोलंदाजीत खूप फरक पडला आहे. मला वाटतं की भारतापुढे प्रत्येक कसोटीत 20 बळी घेणे हे सर्वात मोठं आव्हान असेल. ते सध्याच्या फलंदाजांसोबत चांगली फलंदाजी करतील, परंतु गोलंदाजी त्यांची समस्या आहे. भारताकडे सध्या जसप्रीत बुमराहच्या रुपात एकच अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणताही गोलंदाज फारशा लयीत दिसत नाही.”
हेही वाचा –
“रोहित शर्मा म्हातारा होतोय, त्यानं निवृत्ती…”, भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य
AUS VS PAK; पॅट कमिन्स किंवा मिचेल मार्श नव्हे, ऑस्ट्रेलियाने या तरुण खेळाडूला बनवले कर्णधार
IND VS AUS; तिकडे ऑस्ट्रेलियाने BGT साठी तयारी सुरू केली, भारत मेगा लिलावात व्यस्त