---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी ‘या’ खेळाडूची नियुक्ती, फ्रँचायझीने केली घोषणा

---Advertisement---

आयपीएलच्या आगामी हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामासाठी आपल्या नवीन कर्णधाराची नुकतीच घोषणा केली आहे. यानुसार आता आगामी हंगामात स्फोटक फलंदाज व यष्टीरक्षक रिषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करतांना दिसेल.

दिल्लीचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात फिल्डिंग करतांना श्रेयसच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याचे चाचण्यांअंती स्पष्ट झाल्याने तो संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर झाला होता. आता त्याच्या अनुपस्थितीत पंतच्या खांद्यावर दिल्लीचे कर्णधारपद सांभाळण्याची जबाबदारी असेल.

पंत आहे जबरदस्त फॉर्मात 

भारताचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत गेले काही महिने जबरदस्त फॉर्मात आहे. तसेच दिल्लीच्या संघाचा गेल्या काही हंगामांपासून तो नियमित सदस्य आहे. दिल्ली कॅपिटल्सचा तो सर्वाधिक महागडा खेळाडू देखील आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने संघाला अनेक सामने देखील जिंकवून दिले आहेत. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या जागी त्याला नेतृत्व देण्याचा निर्णय दिल्लीच्या संघ व्यवस्थापनाने घेतला असावा.

कर्णधारपदाच्या शर्यतीत दिग्गजांना टाकले मागे 

श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्लीकडे नेतृत्वासाठी अनेक दिग्गज खेळाडूंचे पर्याय उपलब्ध होते. यात यंदाच्या हंगामात संघात सामील झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथ, तसेच भारतीय कसोटी संघाचे प्रभारी कर्णधारपद सांभाळताना उत्तम कामगिरी केलेला अजिंक्य रहाणे हे दोन खेळाडू प्रमुख दावेदार होते. याशिवाय गेल्या काही हंगामात दिल्लीच्या संघाचे नियमित सदस्य असणारे शिखर धवन आणि आर अश्विन हे दोन पर्याय देखील दिल्लीकडे होते.

मात्र या सर्वांवर मात करत रिषभ पंतच्या गळ्यात आता कर्णधारपदाची माळ घालण्यात आली आहे. मागील हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला होता. त्यामुळे आता यंदाच्या हंगामात युवा रिषभ पंत त्यांना जेतेपदापर्यंत घेऊन जाणार का, याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---