इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम अखेरच्या टप्प्यात आता आला आहे. रविवारपासून (१० ऑक्टोबर) या हंगामातील बाद फेरीला म्हणजेच प्लेऑफला सुरुवात झाली. प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना गुणतालिकेतील दोन अव्वल संघ दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला. या सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे.
या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद रिषभ पंत सांभाळत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीने उत्तम कामगिरी केली आहे आणि गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला आहे. पंत पहिल्यांदाच आयपीएलच्या प्लेऑफमध्ये नेतृत्व करत आहे. तर, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल ११ व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. हा संघ यावर्षी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
आता दिल्ली आणि चेन्नई संघात क्वालिफायर १ चा सामना झाला. या सामन्यातील नाणेफेकीसाठी रिषभ आणि धोनी मैदानात उतरताच त्यांच्या नावावर दोन वेगवेगळे विक्रम नोंदवले गेले आहेत.
पंत आयपीएलमधील प्लेऑफमध्ये नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. त्याने जेव्हा चेन्नईविरुद्ध क्वालिफायर १ मध्ये नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय २४ वर्षे ६ दिवस होते. याबाबतीत त्याने दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यरला मागे टाकले आहे. अय्यरने २०१९ आयपीएलमध्ये पहिल्यांदा प्लेऑफमध्ये दिल्लीचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याचे वय २४ वर्षे १५५ दिवस होते.
याशिवाय धोनी हा आयपीएलमधील प्लेऑफमध्ये नेतृत्व करणारा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. त्याने जेव्हा दिल्लीविरुद्ध नेतृत्व केले, तेव्हा त्याचे वय ४० वर्षे ९६ दिवस होते. याबाबतीत त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले. या यादीत अव्वल क्रमांकावर राहुल द्रविड आहे. द्रविडने २०१३ साली आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये जेव्हा नेतृत्व केले होते, तेव्हा त्याचे वय ४० वर्षे १३३ दिवस होते.
आयपीएलच्या बाद फेरीत नेतृत्व करणारे सर्वात युवा कर्णधार
२४ वर्षे ६ दिवस – रिषभ पंत (२०२१)
२४ वर्षे १५५ दिवस – श्रेयस अय्यर (२०१९)
२५ वर्षे ३५२ दिवस – स्टिव्ह स्मिथ (२०१५)
२६ वर्षे २१ दिवस – रोहित शर्मा (२०१३)
२६ वर्षे १७१ दिवस – युवराज सिंग (२००८)
आयपीएलच्या बाद फेरीत नेतृत्व करणारे सर्वात वयस्कर कर्णधार
४० वर्षे १३३ दिवस – राहुल द्रविड (२०१३)
४० वर्षे ९५ दिवस – एमएस धोनी (२०२१)
३९ वर्षे १८६ दिवस – अनिल कुंबळे (२०१०)
३८ वर्षे २६२ दिवस – शेन वॉर्न (२००८)
३८ वर्षे १५९ दिवस – ऍडम गिलख्रिस्ट (२०१०)
महत्त्वाच्या बातम्या –
भारताचा प्रशिक्षक होण्यासाठी टॉम मूडी वॉर्नरला केले हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?
दिल्ली वि. चेन्नई सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
टी२० विश्वचषकातील सर्व १६ संघ होणार मालामाल! आयसीसीकडून बक्षीस रकमेची घोषणा