भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (०९ फेब्रुवारी) खेळला गेला. भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (rishabh pant) या सामन्यात संघासाठी डावाची सुरुवात केली. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहत्यांसह दिग्गजांनाही अश्चर्य वाटले. ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाची सुरुवात केली आहे. यापूर्वी त्याने २०१६ मध्ये १९ वर्षाखालील संघासोबत खेळताना डावाची सुरुवात केली होती.
भारतीय संघासाठीही देखील हा सामना खास ठरला. तब्बल ११ वर्षांनातर संघाचा कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज या दोघांनी डावाची सुरुवात केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक रिषभ पंत ज्याप्रकारे सलामीवीराच्या भूमिकेत दिसले, अगदी असेच चित्र २०११ सालीही दिसले होते. त्यावेळी कर्णधार विरेंद्र सेहवागसोबत यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल डावाची सुरुवात करण्यासाठी खेळपट्टीवर आला होता. विशेष गोष्ट म्हणजे हे दोन्ही सामने अहमदाबादमध्येच खेळले गेले आणि संघासमोर दोन्ही वेळेस वेस्ट इंडीजचेच आव्हान होते.
रिषभ पंतला अचानक रोहित शर्मासोबत मैदानात येताना पाहून चाहते पुरते हैराण झाले. मागच्या सामन्यात उपकर्णधार केएल राहुल उपस्थित नव्हता आणि ईशान किशन रोहितसोबत सलामीसाठी आला होता. दुसऱ्या सामन्यासाठी केएल राहुलने पुनरागमन केल्यामुळे तो सलामीसाठी येईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती, परंतु झाले काही वेगळेच. रिषभ पंत सलामीसाठी आला, त्याच्या जागी राहुल चौथ्या क्रमांवार खेळला. शिखर धवनच्या रूपात भारतीय संघाकडे एक अनुभवी सलामीवीराचा पर्याय होता, परंतु मालिका सुरू होण्यापूर्वी त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो सध्या विलगीकरणात आहे.
फलंदाजी क्रमवारीत केला गेलेला हा बदल संघासाठी महागात पडल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्माच्या रूपात संघाला पहिला झटका मिळाला, त्याने अवघ्या पाच धावा करून विकेट गमावली. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या अडियन स्मिथने १२ व्या षटकात रिषभ पंत आणि विराट कोहली यांच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या. रिषभ आणि विराट यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या –
पाचव्यांदा अंडर १९ WC जिंकून यंगिस्तान भारतात दाखल, आज रंगणार सन्मान सोहळा
आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी
वडिलांची नजर चुकवून खेळायचा क्रिकेट, आता ठरला १९ वर्षाखालील विश्वचषकाचा हिरो






