आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट यष्टिरक्षण करणाऱ्या रिषभ पंत याने गेल्या काही महिन्यात आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील केलेली कामगिरी असो किंवा भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या २ कसोटी सामन्यातील कामगिरी, त्याने फलदांजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही गोष्टीत उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अशातच माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी देखील पंतचे कौतुक केले आहे.
पंत १०० कसोटी सामने खेळू शकतो
माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज किरण मोरे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, ‘जेव्हा ही मी कुठल्याही कौशल्यवान खेळाडूंना पाहतो तेव्हा माझी सवय आहे की, मी त्याचा नंबर लिहून घेतो. जेव्हा मी पंतला खेळताना पाहिलं तेव्हा मी स्वतःलाच म्हटले की हा मोठ्या शर्यतीचा घोडा आहे. आता मी म्हणतोय की, पंत १०० कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू आहे. फक्त यामुळेच नव्हे की , त्याने मंगळवारी (दुसरा कसोटी सामना चौथा दिवस) यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी केली होती.’
सर्वांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले, परंतु मला याबद्दल काहीच शंका नव्हती.
किरण मोरे यांनी पंतबद्दल पुढे म्हटले की, “सर्वांनी त्याच्या यष्टीमागच्या कामगिरीवर टीका केली होती. परंतु, मला याबद्दल काहीच शंका नव्हती. जर तुम्ही त्याला भारतात खेळण्याची संधीच देणार नसेल, तर तो शिकणार कसा. परदेशात खेळणे हे भारतात खेळण्यापेक्षा जास्त कठीण आहे. चेंडू फिरणाऱ्या खेळपट्टीवर यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. सर्वांनीच पाहिले की पंत काय करू शकतो.”
पंत आणखी उत्कृष्ट यष्टिरक्षक बनू शकतो
पंतने आतापर्यंत खेळलेल्या १८ कसोटी सामन्यांमधून १४ कसोटी सामने हे परदेशात खेळले आहेत. यावर किरण मोरे म्हणाले, “पंतने काही उत्कृष्ट झेल टिपले याव्यतिरिक्त त्याने यष्टीचीत देखील केले. त्याने मिळालेल्या काही संधी गमावल्या. तो अवघ्या २३ वर्षांचा आहे आणि तो सुधारू शकतो. तसेच जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक बनू शकतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ ३७ चेंडूत शतक झळकावणाऱ्या ‘या’ फलंदाजांवर लागू शकते करोडोंची बोली
काय सांगता ? वयाच्या ४७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण, ‘या’ खेळाडूने केला होता विश्वविक्रम
देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या ‘या’ पाच भारतीय क्रिकेटपटूंवर आयपीएल लिलावात पडणार पैशाचा पाऊस?