भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेला आजपासून (19 सप्टेंबर) सुरुवात झाली. पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जातोय. बांगलादेशचा कर्णधार नजमल हुसैन शांतो यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या सत्रात बांगलादेशच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय अगदी योग्य ठरवला. भारताचे टॉप 3 फलंदाज स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 6 धावा करू शकला. तिसऱ्या क्रमांकावर आलेला शुबमन गिल आपलं खातही उघडू शकला नाही. तर बऱ्याच काळानंतर कसोटी क्रिकेट खेळणारा विराट कोहली 6 धावा करून तंबूत परतला. या तिघांनाही वेगवान गोलंदाज हसन मेहमूदनं बाद केलं.
एकवेळ भारताची अवस्था 34-3 अशी केविलवाणी झाली होती. मात्र यानंतर सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि यष्टीरक्षक रिषभ पंत यांनी डाव सांभाळला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली आणि उपहारापर्यंत भारताला आणखी धक्का बसू दिला नाही.
या सामन्यात रिषभ पंतनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पल्ला गाठला. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाल्यानंतर पंत बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. यावर्षी टी20 विश्वचषकाद्वारे त्यानं टीम इंडियात पुनरागमन केलं. आता तो जवळपास 2 वर्षांनंतर कसोटी क्रिकेट खेळतोय.
रिषभ पंतनं भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो महेंद्रसिंह धोनीनंतर केवळ दुसरा यष्टीरक्षक ठरला. भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून धोनीनं 17,092 धावा केल्या आहेत. त्यानंतर आता रिषभ पंतचा क्रमांक लागतो.
भारताकडून सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक
17092 – एमएस धोनी
4000 – रिषभ पंत
3132 – सय्यद किरमानी
2725 – फारुक इंजिनीअर
2714 – नयन मोंगिया
2300 – राहुल द्रविड
या सामन्यात पंत 52 चेंडूत 39 धावा करून बाद झाला. हसन मेहमूदनं त्याला यष्टीमागे झेलबाद केलं. आपल्या या खेळीत त्यानं 6 चौकार मारले.
हेही वाचा –
चेन्नईत असं का केलं?, रोहितच्या या निर्णयानं चाहते हैराण!
ind vs ban; टाॅप ऑर्डर युनीट सपशेल फ्लाॅप; रोहित-विराट सहा, तर गिल शून्यवर बाद
पहिल्या कसोटीत आरसीबीच्या गोलंदाजाला संधी; दुलीप ट्रॉफीत केला होता कहर