---Advertisement---

रिषभ पंतची चूक नडली? ‘तो’ निर्णय घेतला असता, तर कदाचीत दिल्ली प्लेऑफ खेळली असती

Rishabh-Pant
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात शनिवारी (२१ मे) ६९ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. हा सामना जिंकून दिल्लीला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी होती. पण हा सामना मुंबईने ५ विकेट्सने जिंकला. त्यामुळे दिल्लीचे स्पर्धेतील आव्हान संपले आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला प्लेऑफमधील चौथ्या संघाचे तिकीट मिळाले. पण, दिल्लीच्या या पराभवासाठी कर्णधार रिषभ पंतची एक चूक देखील कारणीभूत ठरली. 

या सामन्यात दिल्लीने मुंबईला १६० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून टीम डेव्हिडने (Tim David) आक्रमक खेळ केला. त्याने ११ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ चौकार आणि ४ षटकार मारले. विशेष म्हणजे डेव्हिड लवकर बाद होऊ शकला असता, पण पंतने त्याच्याविरुद्ध डीआरएसचा (DRS) वापर न करण्याचा निर्णय घेतला. जर कदाचीत पंतने (Rishabh Pant) रिव्ह्यू घेतला असता तर सामन्याचा निकाल बदलला असता.

या सामन्यात (Mumbai Indians vs Delhi Capitals) पंतने डेवाल्ड ब्रेविसचा देखील एक झेल सोडला होता. पण, त्याला १५ व्या षटकात शार्दुल ठाकूरने बाद केले. याच षटकात टीम डेव्हिडही बाद झाला असता, तेही पहिल्याच चेंडूवर. शार्दुलने डेव्हिडला ऑफ स्टंपच्या बाहेर एक चांगला चेंडू टाकला होता. ज्यावर डेव्हिडने कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण, यष्टीमागे उभ्या असलेल्या पंतने तो चेंडू पकडला आणि जोरदार अपील केले.

पण, मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद दिले. त्यावर पंत डीआरएस घेईल असे सर्वांना वाटले होते. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्सकडे २ रिव्ह्यू बाकी होते. पण पंतने रिव्ह्यू घेतला नाही आणि डेव्हिड नाबाद राहिला. नंतर जेव्हा रिप्ले पाहाण्यात आला, तेव्हा त्यात दिसत होते की, बॅट आणि चेंडू यांच्यात संपर्क झाला आहे. त्यामुळे डेव्हिडला विकेट गमवावी लागली असती. मात्र, पंतने रिव्ह्यू न घेतल्याने डेव्हिड पुढे खेळला.

डेव्हिडने या जीवदानाचा फायदा घेत मुंबईला विजयाच्या जवळ नेले. अखेरीस रमणदीप सिंगने मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईकडून इशान किशनने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. दिल्लीकडून एन्रीच नॉर्किया आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली. त्यांनी २० षटकात ७ बाद १५९ धावा केल्या. दिल्लीकडून रोवमन पॉवेलने सर्वाधिक ४३ धावा केल्या. तसेच कर्णधार रिषभ पंतने ३९ धावा केल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण

दिल्ली प्लेऑफमधून बाहेर होताच, मुंबईचा चारवर्षांपूर्वीचा हिशोब चूकता, वाचा नक्की काय झालेलं

दिल्लीचा कर्णधार पंतने गमावली चालून आलेली संधी, तरीही पाँटिंगने केला बचाव; म्हणे, ‘तो अजून युवा..’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---