श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा युवा रिषभ पंतच्या हाती देण्यात आली आहे. ही भूमिका तो योग्यरीत्या पार पाडत आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानी आहे. मंगळवारी (२७ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला १ धावाने पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत रिषभ पंतने भिवनिक वक्तव्य केले.
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रिषभ पंतने चिवट झुंज दिली. तरीही शेवटी त्याच्या हाती अपयश आले. त्याने सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “खरं तर मी खूप निराश आहे. विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही पराभवाच्या दारात उभे असता, तेव्हा खूप वाईट वाटते. त्यांनी (बेंगलोर) या खेळपट्टीवर १० ते १५ धावा जास्त केल्या होत्या. हेट्टीने (हेटमायर) एक उत्कृष्ट खेळी केली होती. त्यामुळे आम्ही आव्हानाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. शेवटच्या षटकात आम्ही विचार करत होतो की, ज्यालाही अखेरचा चेंडू खेळायला मिळेल त्याने सामना जिंकवण्याचाच प्रयत्न करावा. ही आमची रणनिती होती. शेवटी आम्ही १ धाव मागे राहिलो.”
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने उभारला होता १७१ धावांचा डोंगर
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एबी डिविलियर्सने तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. त्याने अवघ्या ४२ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांचा मदतीने नाबाद ७५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १७१ धावांचा डोंगर उभारला होता.
रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांची झुंज ठरली अपयशी
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतले होते. त्यामुळे सामना जिंकवण्याची जबाबदारी कर्णधार रिषभ पंतवर आली होती. तसेच दिल्ली संघाच्या धावा ९२ वर ४ गडी बाद असताना शिमरॉन हेटमायरने मैदानात एन्ट्री केली होती. त्याने रिषभ पंतसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली होती. या सोबतच काईल जेमिसनच्या एकाच षटकात ३ षटकार लगावत त्याने अर्धशतक देखील झळकावले होते. तसेच रिषभ पंतने ही अर्धशतक झळकावले होते.
शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्स संघाला ६ धावांची आवश्यकता असताना रिषभ पंतने चौकार मारला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १ धावाने हा सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ निर्णय घेत रिषभ बचावला अन् कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला, बघा नक्की काय किस्सा घडला
बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा
हेटमायरची ५३ धावांची झुंज व्यर्थ, पराभवानंतर त्याची रिऍक्शन पाहून तुमच्याही डोळ्यात तरळतील अश्रू