न्यूझीलंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघाचा अखेरचा सामना बुधवारी (30 नोव्हेंबर) ख्राईस्टचर्च येथे सुरू झाला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील या अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय संघाला अडचणीत आणले. त्याचवेळी भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याच्या अपयशाची मालिका या सामन्यातही सुरू राहिली.
मालिकेत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तिखट माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही. भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन व शुबमन गिल अनुक्रमे 28 व 13 धावा करून माघारी परतले. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला रिषभ पंत याची जादू या सामन्यातही चालली नाही. तो 16 चेंडूवर 10 धावा करत बाद झाला.
रिषभ हा मागील बऱ्याच काळापासून सातत्याने अपयशी ठरत आहे. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेनंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नाही. टी20 विश्वचषकातही दोन सामन्यात त्याला आपला प्रभाव पाडता आला नाही. तर, या दौऱ्यावरील टी20 व वनडे अशा दोन्ही मालिकांमध्ये त्याची बॅट थंडावलेलीच आहे.
रिषभ पंत हा अपयशी ठरत असल्याने त्याला संघातून बाहेर करण्याची मागणी वारंवार होतेय. पंतमुळे चांगली कामगिरी केल्यानंतर ही संजू सॅमसन याला बाकावर बसावे लागत असल्याचे दिसून येते. सततच्या या खराब कामगिरीमुळे पंत अनेक माजी क्रिकेटपटूंच्या निशाण्यावर देखील आला आहे. काही दिग्गजांनी त्याने पुन्हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये जाऊन आपला फॉर्म मिळवावा, असे देखील सुचवले आहे.
(Rishabh Pant Flop Again In 3rd ODI Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऋतुराजच्या मनाचा मोठेपणा! म्हणाला, “माझे द्विशतक संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करतो”
‘बास करा माझी इंग्रजी इथेच संपली’, पाकिस्तानी खेळाडूकडून पत्रकार परिषदेत स्पष्ट उत्तर






