ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार मिचेल मार्श हा भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या क्रिकेटमध्ये अप्रतिम पुनरागमनाने इतका प्रभावित झाला आहे. मार्श याने त्याला एक ‘विलक्षण खेळाडू’ म्हटले. तसेच पंत याने ऑस्ट्रेलियासठी खेळायला हवे होते, अशी इच्छा त्याने व्यक्त केली. या वर्षाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या स्वरूपात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर, पंतने अलीकडेच चेन्नई येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शतक झळकावून पुनरागमन केले.
2022 मध्ये एका भीषण कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर पंतच्या पुनरागमनाने मार्श प्रभावित झाला. भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाची सकारात्मकता, स्पर्धात्मकता आणि जिंकण्याची भूक पाहून मार्श म्हणाला, “तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. माझी इच्छा आहे की, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळायला हवा होता. गेल्या काही वर्षांत त्याने खूप काही सहन केले. हे एक शानदार होते.”
तो पुढे म्हणाला, “तो एक सकारात्मक व्यक्ती आहे. अजूनही खूप तरुण आहे आणि त्याला जिंकणे आवडते. तो अत्यंत स्पर्धात्मक असून, त्याचे व्यक्तिमत्त्व शांत आहे. तो नेहमी हसतमुख असतो.”
पर्थ येथे 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये पंत हा भारतीय फलंदाजीतील महत्त्वाचा भाग असेल अशी अपेक्षा आहे.
या डावखुऱ्या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करत 12 डावात 62.40 च्या सरासरीने 624 धावा केल्या होत्या. ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 159 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. या 26 वर्षीय खेळाडूने 2021 मध्ये ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद 89 धावा केलेल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला या मैदानावर 32 वर्षानंतर पहिल्यांदाच कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले. तर या विजयामुळे भारतीय संघाने मालिका 2-1 ने जिंकली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनेही पंतच्या क्षमतेचे कौतुक केले.
हेही वाचा-
रिषभ पंतची आरसीबीच्या कर्णधारपदावर नजर? यष्टीरक्षकाने सर्वकाही खरं सांगून टाकलं
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!
रिकी पाँटिंग येताच पंजाब किंग्जच्या दोन खास सदस्यांचा रामराम, एका भारतीयाचाही समावेश