गेले काही दिवस डीआरएसच्या नियमांवरून क्रिकेट विश्वात घमासान चालू आहे. डीआरएसच्या अनेक अनाकलनीय तरतूदींमुळे खेळाडूंनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता त्यातील अशाच एका तरतूदीचा भारतीय संघाला फटका बसला आहे. ज्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात भारताला चार धावांचे नुकसान सोसावे लागले.
काय होते प्रकरण?
त्याचे झाले असे की, पहिल्या डावात भारतीय संघ फलंदाजी करत असतांना ४०व्या षटकांत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टॉम कुरन गोलंदाजी करत होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिषभ पंतने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू बाउंड्रीपार पण गेला होता. मात्र इंग्लंडच्या खेळाडूंना हा चेंडू पंतच्या पॅडला लागला, असे वाटल्याने एलबीडब्ल्यूचे अपील केले. यावर पंचांनी पंतला बाद देखील दिले.
मात्र यावर पंतने लगेचच रिव्ह्यू अर्थात डीआरएस घेतला. त्यावेळी पाहिल्या गेलेल्या रिप्ले मध्ये चेंडू पंतच्या बॅटला लागले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रिषभ पंतला तिसर्या पंचांनी नॉट आऊट घोषित केले. मात्र मैदानावरील पंचांनी त्याआधीच त्याला आऊट दिले असल्याने नियमानुसार तो डेड बॉल ठरला होता. त्यामुळे चेंडू बाउंड्रीपार जाऊन देखील भारताला एकही धाव मिळाली नाही.
काय सांगतो नियम?
डीआरएसच्या एका नियमामुळे भारताला या चार धावा नाकारण्यात आल्या. या नियमानुसार जर मैदानावरील पंचांनी फलंदाजाला बाद दिले असेल, तर तो चेंडू निर्धाव समजला जातो. त्या चेंडूवर काढलेल्या धावा ग्राह्य धरल्या जात नाहीत. मात्र तो चेंडू ग्राह्य धरला जातो. त्यामुळे पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आऊट दिल्यावर फलंदाज डीआरएसच्या मदतीने आपली विकेट वाचवू शकतो, मात्र धावांच्या बाबतीत त्याला उपाशीच राहावे लागते.
हा नियम देखील अडचणीत आणणारा ठरू शकतो. जर वर्ल्डकप सारख्या अतिशय महत्त्वपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीत असा प्रकार घडल्यास, अंतिम चेंडूवर ४ धावा हव्या असतांना चौकार मारूनही पंचांनी आऊट दिलेले असल्यास संघाचे मोठे नुकसान होऊ शकते.
अशा परिस्थितीत डीआरएस उपलब्ध असून देखील त्या संघाला फायदा होणार नाही, कारण डीआरएसच्या मदतीने फलंदाज आऊट होण्यापासून बचावला तरी त्याला धावा मिळणार नाहीत आणि संघाला त्यामुळे पराभूत व्हावे लागले. अशी परिस्थिती ओढवून कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये यासाठी आयसीसीला या नियमाचा लवकरच पुनर्विचार करावा लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
अवघ्या १५० चेंडूत ३५० धावा करणारा फलंदाज करतोय भारताविरुद्ध पदार्पण, जाणून घ्या त्याच्याविषयी
पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?
वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न