पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकतीच वनडे मालिका संपली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे झालेल्या वनडे मालिकेतील तिसरा सामना रविवारी पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. भारताच्या या विजयात रिषभ पंतचा मोठा वाटा होता.
त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत ६२ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच त्याने दुसऱ्या वनडे सामन्यांत देखील ७ षटकारांसह ताबडतोड ७७ धावांची खेळी केली होती. यामुळे ३ सामन्यांच्या या वनडे मालिकेत त्याचे एकूण ११ षटकार झाले. त्यामुळे त्याच्या नावावर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७५ षटकार जमा झाले आहेत. यासह त्याच्या नावावर एक विक्रमही झाला आहे.
पंत सध्या २३ वर्षांचा आहे. त्यामुळे वयाच्या २३ व्या वर्षाअखेरीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत ५८ षटकार मारले होते. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर सुरेश रैना आहे. त्याने ७७ षटकार वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत मारले होते.
यंदाच्या वर्षी रिषभ पंतने मारले सर्वाधिक षटकार
एवढेच नाही तर २०२१ या वर्षात आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीतही रिषभ पंत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने आत्तापर्यंत १३ सामन्यांत २८ षटकार मारले आहेत. त्याच्या पाठोपाठ या यादीत न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टील आहे. गप्टीलने आत्तापर्यंत यावर्षी ९ सामन्यांत २२ षटकार मारले आहेत. तसेच तिसऱ्या क्रमांकावर या यादीत अफगाणिस्तानचा रेहमनतुल्लाह गुरबाज आहे. त्याने आत्तापर्यंत यावर्षी ६ सामन्यांत २० षटकार ठोकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०० धावा बनविणारे संघ, भारत ‘या’ स्थानावर
असं नक्की घडलं काय की विराट आणि वूडमध्ये पेटला वाद, चाहत्यांनाही पडला प्रश्न