फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघात (India vs Sri Lanka) ३ सामन्यांची टी२० आणि २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकांसाठी शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. याबरोबरच रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडे वनडे आणि टी२० बरोबरच भारताच्या कसोटी संघाच्या नेतृत्त्वाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तसेच भारतीय संघाच्या निवड समीतीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी रोहितला भारताच्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघांचा कर्णधार म्हणून घोषित करताना स्पष्ट केले की, त्याच्या देखरेखेखाली रिषभ पंत (Rishabh Pant), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि केएल राहुल (KL Rahul) या तिघांना भविष्यातील भारताचा कर्णधार म्हणून तयार केले जाईल. त्यामुळे या तिघांना भविष्यात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.
दरम्यान, रिषभ, राहुल आणि बुमराहच्या नेतृत्त्वाच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाल्यास रिषभ आणि राहुलला बऱ्यापैकी कर्णधारपदाचा अनुभव आहे. मात्र, बुमराहला फारसा नेतृत्त्वाचा अनुभव नाही.
केएल राहुलची कर्णधार म्हणून निराशाजनक कामगिरी
केएल राहुल भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघाचा उपकर्णधार आहे. त्यामुळे त्याला याआधी नियमित कर्णधारांच्या अनुपस्थितीत भारताच्या नेतृत्त्वाची संधी मिळाली आहे. त्याने भारताचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान एका कसोटीत आणि तीन वनडे सामन्यात नेतृत्त्व केले आहे. मात्र, त्याच्या पदरी निराशाच पडली. कारण, भारताने हे सर्व सामने गमावले होते.
याशिवाय केएल राहुलने आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने २०२० आणि २०२१ अशा दोन हंगामात नेतृत्त्व केले आहे. मात्र, आयपीएलमध्येही कर्णधार म्हणून त्याची निराशाच झाली. त्याने नेतृत्त्व केलल्या या दोन्ही हंगामात पंजाब संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर राहिला.
रिषभ होऊ शकतो उत्तम कर्णधार
भारताचा एक चांगला युवा खेळाडू म्हणून रिषभ पंतकडे पाहिले जाते. २४ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या रिषभ भारताचा चांगला कर्णधार होऊ शकतो. यासाठी महत्त्वाचे कारण म्हणजे तो यष्टीरक्षक आहे. असे म्हटले जाते, की एक यष्टीरक्षक मैदानावरील चारही बाजूंना लक्ष ठेवू शकत असल्याने तो चांगला कर्णधार बनू शकतो.
याशिवाय रिषभची आयपीएलमध्येही कर्णधार म्हणून चांगली कामगिरी झाली आहे. त्याने २०२१ आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्त्व केले होते. त्याने त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्ली संघाला प्लेऑफपर्यंत पोहचवले होते. तसेच रिषभच्या बाबतीत झुकतं माप देणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे वय. तो अद्याप २४ वर्षाचा असल्याने त्याच्याकडे कर्णधार म्हणून दिर्घकाळासाठी पर्याय म्हणून पाहिले जाऊ शकते.
बुमराहकडे नेतृत्त्वाच्या अनुभवाचा अभाव
चेतन शर्मा यांनी भारताच्या भविष्यातील कर्णधार म्हणून ज्या तीन खेळाडूंचे पर्याय समोर ठेवले, त्याच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. पण, बुमराहला देशांतर्गत क्रिकेटमध्येच नाही, तर आयपीएलमध्येही कर्णधारपदाचा अनुभव नाही. त्याचबरोबर आत्तापर्यंत भारताकडून खूप कमी गोलंदाज असे झाले आहेत, ज्यांनी यशस्वीरित्या भारताचे नेतृत्त्व केले आहे. यात कपिल देव आणि अनिल कुंबळे यांचा अपवाद वगळता भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून कोणत्या गोलंदाजाचे नाव पुढे येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहला मागे टाकत चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
आयपीएल लिलावात बोली लागली नाही, पण टीम इंडियात एंट्री करणारा कोण आहे सौरभ कुमार?
विराट-पंतच्या अनुपस्थितीत तिसऱ्या टी२० साठी ‘अशी’ असू शकते टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन