भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शुक्रवारपासून (०४ मार्च) ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ संपला असून भारतीय संघ ८५ षटकांनंतर ६ बाद ३५७ धावा अशा स्थितीत आहे. भारतीय संघाकडून पहिल्या दिवशी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. मात्र केवळ ४ धावांनी त्याचे शतक हुकले आहे. यासह पंतने काही नकोशे विक्रम खात्यात नोंदवले आहेत.
१७० धावांवर ३ बाद अशी स्थिती असताना पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या क्रमांकावर आपल्या शैलीत फलंदाजी करत ९६ धावा केल्या. ९७ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. मात्र शतकापासून केवळ ४ धावांनी दूर असताना श्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमलने पंतला त्रिफळाचीत केले. त्यामुळे तो नर्वस नाइंटीजचा (नव्वद धावांमध्ये बाद होणे) शिकार ठरला.
पंतने कसोटी क्रिकेटमध्ये नर्वस नाइंटीजवर बाद होण्याची ही पाचवी वेळ होती. यापूर्वीही तो ३ वेळा भारतात कसोटी सामना खेळताना नव्वद धावांमध्ये बाद झाला आहे. तर केवळ वेळा परदेशात खेळताना तो शतकाच्या नजीक पोहोचून आपली विकेट गमावून बसला आहे.
पाचवेळा शतकापासून हुकलाय पंत
ऑगस्ट २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पंत सर्वप्रथम वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट येथील कसोटी सामन्यात ९२ धावांवर बाद झाला होता. तर त्याच मालिकेतील हैदराबाद येथील सामन्यातही त्याने ९२ धावांवरच आपली विकेट गमावली होती. त्यानंतर २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात फक्त ३ धावांनी त्याचे शतक हुकले होते. तर इंग्लंडविरुद्ध चेन्नईतील कसोटी सामन्यातही तो शतकापासून ९ धावांनी दूर असताना तंबूत परतला होता. त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्ध तो नर्वस नाइंटीजचा शिकार बनला आहे.
एबी डिविलियर्सची केली बरोबरी
पाचव्यांदा कसोटी क्रिकेटमध्ये नर्वस नाइंटीजवर बाद होत पंतने दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिविलियर्स (AB De Villiers) ची बरोबरी केली आहे. तो वयाची २५ वर्षे पूर्ण करण्यापूर्वी सर्वाधिक ५ वेळा कसोटीत नर्वस नाइंटीवर बाद होण्याच्या विक्रमात डिविलियर्सशी बरोबरीत आला आहे.
धोनीनंतर पंतच्याही नावे नकोशा विक्रम
याखेरीज पंत कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिकवेळा नर्वस नाइंटीवर बाद होणारा दुसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni)च्या नावे हा नकोसा विक्रम होता. तोदेखील कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५ वेळा शतकाच्या जवळ पोहोचून बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून उतरले मैदानात, पाकिस्तानविरुद्ध खेळतायेत कसोटी
शंभराव्या कसोटीपूर्वी कोहलीचे ‘विराट’ काम, भटक्या जनावरांच्या मदतीसाठी उचलले ‘हे’ पाऊल