भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या दुखापतीवर बीसीसीआयनं अपडेट जारी केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर काही वेळानं त्याच्या गुडघ्यावर सूज आली होती, ज्यानंतर तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थिती शेवटच्या सत्रात ध्रुव जुरेलनं यष्टीरक्षण केलं होतं. आता बीसीसीआयनं रिषभच्या दुखापतीवर अधिकृत अपडेट दिलं आहे.
बीसीसीआयनं तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी सांगितलं की, रिषभ पंत तिसऱ्या दिवशी विकेटकिपिंग करणार नाही. त्याच्याजागी ध्रुव जुरेल ही जबाबदारी सांभाळेल. बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीत रिषभ पंतला त्याच पायावर चेंडू लागला होता, ज्या पायाचं ऑपरेशन झालं होतं. पंतचा पाय कार अपघातात जखमी झाला होता. आता त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची चिंता वाढली आहे.
भारतीय संघाला आगामी काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. टीम इंडिया वर्षाच्या अखेरीस 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत रिषभ पंत भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू असेल. मागच्या वेळी तो ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचा हिरो होता.
रिषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. तो 2023 मध्ये एकही सामना खेळला नाही. त्यानं आयपीएल 2024 द्वारे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केलं. यानंतर तो टी20 विश्वचषकात खेळला. तेव्हापासून तो भारतीय संघासाठी सातत्यानं क्रिकेट खेळतो आहे. पंत श्रीलंकेविरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिका खेळला. यानंतर त्यानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही शानदार कामगिरी केली होती. आता त्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
हेही वाचा –
टीम इंडिया अजूनही जिंकू शकते बंगळुरू कसोटी, कराव लागेल फक्त हे काम
काय सांगता! जोफ्रा आर्चरनं 10 वर्षांपूर्वीच केली होती भारत 46 धावांवर ऑलआऊट होण्याची भविष्यवाणी!
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारत पाकिस्तानमध्ये जाणार? विदेशी मंत्रालयाचे मोठे वक्तव्य!