दिल्ली। शनिवारी(4 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2019मधील 52 वा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियमवर पार पडला. दिल्लीने घरच्या मैदानावर या मोसमातील हा शेवटचा सामना खेळताना 5 विकेट्सने विजय मिळवला.
दिल्लीच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने नाबाद अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 38 चेंडूत नाबाद 53 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. याबरोबरच एक खास विक्रम करताना माजी दिग्गज फलंदाज विरेंद्र सेहवागलाही मागे टाकले आहे.
पंतने आयपीएलमध्ये 2016 ला दिल्ली संघाकडून पदार्पण केले. तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत दिल्लीकडून खेळताना 88 षटकार मारले आहेत. त्यामुळे तो आयपीएलमध्ये दिल्लीकडून सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
याबरोबरच त्याने विरेंद्र सेहवागच्या 85 षटकारांना मागे टाकले आहे. सेहवागने आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना 85 षटकार मारले आहेत. या यादीत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दिल्लीकडून 67 षटकार मारले आहेत.
शनिवारी झालेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 9 बाद 115 धावा केल्या होत्या. परागने 49 चेंडूत 50 धावांची खेळी केली. गोलंदाजीत दिल्लीकडून इशांत शर्मा आणि अमित मिश्राने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच ट्रेंट बोल्टने 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर 116 धावांचे आव्हान दिल्लीने पंतच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 16.1 षटकात सहज पार केले. राजस्थानकडून इश सोधीने 3 आणि श्रेयस गोपाळने 2 विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये दिल्लीकडून सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
88 – रिषभ पंत
85 – विरेंद्र सेहवाग
67 – श्रेयस अय्यर
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहली, डिविलियर्सने शेवटच्या सामन्याआधी मागितली चाहत्यांची माफी, पहा व्हिडिओ
–…आणि अमित मिश्राची आयपीएलमधील चौथी हॅट्रीक हुकली, पहा व्हिडिओ
–१७ व्या वर्षी आयपीएलमध्ये शानदार अर्धशतक करणाऱ्या रियान परागने रचला इतिहास






