भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील टी२० मालिका रोमांचक घडीवर होती. मात्र रविवारी (१९ जून) बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला पाचवा आणि अखेरचा टी२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला, जो निर्णायक होता. पावसामुळे केवळ ३.३ षटकांचा खेळ होऊ शकला, ज्यामध्ये भारतीय संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर २८ धावा केल्या. त्यानंतर पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे अखेर सामना रद्द करण्यात आला आणि मालिका २-२ ने बरोबरीत सुटली. यानंतर भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रिषभ पंत याने निराशा जाहीर केली आहे.
निर्णायक सामना रद्द झाल्यानंतर रिषभ पंत (Rishabh Pant Statement) म्हणाला की, “हा सामना (INDvsSA) होऊ न शकल्याने मी नक्कीच निराश आहे. परंतु या मालिकेतून बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेत. सुरुवातीला मालिकेत ०-२ ने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने कमालीचे पुनरागमन केले. एक संघ म्हणून आम्ही सध्या अशा स्थितीत आहोत, जिथे आम्ही विजयासाठी वेगवेगळ्या मार्गांच्या शोधात आहोत. “
पुढे आपल्या वैयक्तिक प्रदर्शनाबद्दल बोलताना पंत म्हणाला की, “एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून मी माझे १०० टक्के देण्याच्या विचारात होतो. परंतु हे तुम्हाला ठरवावे लागेल की, मी खेळाडू आणि कर्णधाराच्या रूपात कसे प्रदर्शन करत आहे. मी नेहमीच मैदानावर जाऊन माझे १०० टक्के देण्यासाठी प्रयत्नशील असतो. यासाठी मी सातत्याने माझ्या प्रदर्शनात सुधारणा करत राहातो.”
सलग पाच वेळा नाणेफेक हरण्यावर पंतची प्रतिक्रिया
दरम्यान या टी२० मालिकेत नाणेफेकीचा निकाल मात्र पंतच्या बाजूने राहिला नाही. त्याने मालिकेतील पाचही सामन्यात नाणेफेक गमावली. याबद्दल निराशा व्यक्त करत तो म्हणाला की, “या गोष्टी माझ्या नियंत्रणात नाही. परंतु ही पहिलीच वेळ होती, जेव्हा मी इतक्यांदा नाणेफेक हरलो आहे.”
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याबद्दल दिली प्रतिक्रिया
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका संपल्यानंतर आता पंत इंग्लंडला रवाना होणार आहे. १ जुलैपासून ऍजबस्टन येथे भारतीय संघाला पाचवा कसोटी सामना खेळायचा आहे. पंतही या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग आहे. या सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाला की, “आम्ही इंग्लंडमध्ये होणारा कसोटी सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहोत. वैयक्तिक रूपात मी बॅटने अधिकाधिक योगण्यासाठी प्रयत्नशील असेल.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मेघराजामुळे रद्द झाली पाचवी टी२०, निराश चाहत्यांचा बीसीसीआयवर निशाणा; ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर
भारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास? घ्या जाणून
‘मागच्या वर्षी डावलले पण यावर्षी टी-२० विश्वचषकात चहल गेम चेंजर ठरणार’, माजी दिग्गजांचे भाकीत