---Advertisement---

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची आहे ‘ही’ योजना, रिषभ पंतचा खुलासा

Rishabh Pant
---Advertisement---

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ २-० अशा विजयी आघाडीवर आहे. दरम्यान, भारताने दुसरा सामना ८ धावांनी जिंकला होता. या विजयात प्रभारी उपकर्णधार रिषभ पंत याने (Rishabh Pant) मोलाचे योगदान दिले होते. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. यानंतर पंतने आपली प्रतिक्रिया देताना भारताच्या आगामी टी२० विश्वचषकातील योजनेबद्दलही भाष्य केले. 

पंतने या सामन्यात २८ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ५२ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारताला २० षटकांत ५ बाद १८६ धावांपर्यंत पोहचता आले.

या सामन्यानंतर जेव्हा पंतला यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचचषकातील (T20I World Cup 2022) भारतीय संघाच्या योजनेबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, ‘विश्वचषकासाठी अजून काही वेळ उरला आहे, त्यामुळे आमची योजना हीच आहे की, जेवढे शक्य होईल तेवढ्या पर्यांयांचा वापर करून पाहायचा.’

पंत पुढे म्हणाला, ‘आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, की कोण कोणत्या स्थानावर योग्य असेल आणि संघाला कसा फायदा होऊ शकतो. आम्ही अनेक पर्यायांचा वापर करत आहे. शेवटी संघासाठी जे योग्य असेल, तोच अंतिम निर्णय असेल.’

ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० विश्वचषक १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा १६ देशांच्या संघात होणार असून सात वेगवेगळ्या शहरात सामने होणार आहेत. भारताचा समावेश सुपर १२ फेरीसाठी दुसऱ्या गटात आहे. भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल.

दुसऱ्या सामन्याच्या अखेरीस होता दबाव
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात अखेरच्या षटकांत रोमांचक वळण आले होते. या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी २५ धावांची गरज होती. याचवेळी रोवमन पॉवेलने सलग २ षटकार मारले होते आणि वेस्ट इंडिजला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण हर्षल पटेलने अखेरचे दोन चेंडूं चांगले टाकत वेस्ट इंडिजला विजयापासून ८ धावा दूर ठेवले.

याबद्दल पंत म्हणाला, ‘दोन सलग षटकारांनंतर आमचे बोलणे झाले होते की, तो ऑफ साईडच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न करेल. पण शेवटी त्याने त्याच्या मजबूत कौशल्यानुसार काम केले. नक्कीच सामन्यात दबाव होता, पण एक खेळाडू म्हणून आम्ही फार जास्त विचार करण्यापेक्षा आमच्या कौशल्यावर लक्ष देतो.’

त्याचबरोबर पंतला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघातील स्थान निश्चित असेल का, असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘हा संघाच्या योजनेचा भाग आहे. एक खेळाडू म्हणून मी हा विचार करत नाही की मी हे स्थान सुरक्षित करेल किंवा दुसरे.’

पंत सध्या भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघातील प्रमुख यष्टीरक्षक आहे. त्यामुळे त्याला आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. तिसरा टी२० सामना रविवारी (२० फेब्रुवारी) पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितचा उत्तराधिकारी म्हणून पंत, केएल आणि बुमराहचा पर्याय, पण कोण होऊ शकतो चांगला कर्णधार?

बुमराहला मागे टाकत चहल बनणार भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

आयपीएल लिलावात बोली लागली नाही, पण टीम इंडियात एंट्री करणारा कोण आहे सौरभ कुमार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---