अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आज (६ मार्च) संपन्न झाला. या सामन्यात यजमानांनी सर्व विभागात दमदार कामगिरी करत एक डाव आणि २५ धावांनी पाहुण्यांना पराभूत केले. यासह भारताने ही कसोटी मालिकाही ३-१ ने खिशात घातली आहे. या सामन्यात सामनावीर ठरलेल्या रिषभ पंतने सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना अनेक गोष्टींचा उलगडा केला.
पंतने पटकावला सामनावीर पुरस्कार
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतने शतकी खेळी करत भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. रिषभने १०१ धावांची खेळी करताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
रिषभने दिली दिलखुलास उत्तरे
सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात रिषभने हर्षा भोगले यांच्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. आपल्या आनंदाचे कारण सांगताना तो म्हणाला, “मी केलेल्या सरावामुळे साध्य झाले. संघाला गरज असताना चांगली कामगिरी केल्याचा आनंद असतो.”
रिषभने जेम्स अँडरसनला मारलेल्या रिव्हर्स फ्लिकविषयी सांगताना म्हटले, “मला पुन्हा अशी संधी मिळाली तर वेगवान गोलंदाजांविरुद्ध मी हा रिव्हर्स फ्लिक मारेल.”
यष्टीरक्षण करताना रिषभ वारंवार पाठीमागून काहीतरी बोलत असतो. त्याविषयी हर्षा भोगले यांनी त्याला सांगितले की, तू आमच्यासारख्या अनुभवी समालोचकांना मागे टाकतो. त्यावेळी उत्तर देताना तो म्हणाला, “हे माझे कौतुक आहे पण माफ करा, तुमच्यासाठी ही समस्या बनली असेल. मी आत्तापर्यंत हेच मानून क्रिकेट खेळलो आहे की, खुश राहण्यासाठी क्रिकेट खेळावे आणि इतरांना खुश करावे.”
रिषभने गाजवली इंग्लंड विरुद्धची मालिका
रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध संपन्न झालेली चार कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच गाजवली. त्याने चार सामन्यांच्या सहा डावांमध्ये मिळून ५४.०० च्या सरासरीने २७० धावा फटकावल्या. ज्यामध्ये एक शतक व दोन अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, यष्टीरक्षक म्हणून देखील त्याने प्रभावी कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे अभिनंदन करताना सेहवागचे ‘हटके’ ट्विट; म्हणाला, ‘इंग्लंड अहमदाबादमध्ये हरला नाही तर…’
विराटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, कर्णधारांच्या ‘या’ यादीत पटकावले दुसरे स्थान
एबी डिविलियर्सने केले विराटचे कौतुक; म्हणाला, ‘त्याच्या नेतृत्वाने युवा क्रिकेटपटूंना….’