भारताचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत हा मागील दीड वर्षापासून सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ अडचणीत असताना त्याने मॅचविनिंग खेळी करत ब्रिस्बेन कसोटीसह भारताला मालिका जिंकून दिली. त्यानंतर तो आता इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. तत्पूर्वी, रिषभने एका मुलाखतीत बोलताना आपल्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी अनेक महत्त्वाच्या बाबी सांगितल्या.
हा एक अद्भुत प्रवास
रिषभने नुकतेच एका मुलाखतीत आपल्या कारकीर्दीविषयी मत व्यक्त केले. तो म्हणाला, “मला वाटते की हा एक अद्भुत प्रवास आहे. कारण, यामध्ये बरेच चढ -उतार आले आहेत. मात्र, माझ्यासाठी हा उत्कृष्ट अनुभव होता. एक क्रिकेटर म्हणून तुम्ही विकसित होत आहात, तुमच्या चुकांमधून शिकत आहात, स्वतःमध्ये सुधारणा करा, मैदानावर परत या आणि चांगली कामगिरी करा. हे सर्व काही शिकायला मिळाले.”
पंत पुढे बोलताना म्हणाला, “मला वाटते की एक क्रिकेटपटू म्हणून मी गेल्या एक वर्षापासून जे करत आहे, त्यामुळे विकास घडत आहे असे वाटते. तुम्ही योग्य रीतीने मेहनत घेत असताना मात्र कधीकधी मनासारखे परिणाम मिळत नाही. परंतु, आपल्याला आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल आणि पुन्हा तेच करत रहावे लागेल. मला आता मेहनतीचे फळ मिळत आहे. त्यामुळे आनंद होतो.”
भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे रिषभ
रिषभ पंत सध्या भारतीय कसोटी संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक बनला आहे. त्याने मागील इंग्लंड दौरा वेळी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत २१ कसोटी सामने खेळताना ४३.८४ च्या सरासरीने तीन शतके व सहा अर्धशतकांसह १४०३ धावा बनविल्या आहेत.
रिषभ सध्या इंग्लंडमध्ये असून ४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याच्याकडून भारतीय संघाला भरपूर अपेक्षा असते. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तो उत्कृष्ट कामगिरी करू शकला नव्हता. तसेच, कोरोनाबाधित आढळल्याने तो सराव सामन्यात देखील सहभागी होऊ शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीकाकारांना उत्तर देण्याची मोठी संधी सॅमसनने गमावली, माजी भारतीय क्रिकेटरने व्यक्त केली निराशा






