इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सध्या तिसरा कसोटी सामना लीड्समध्ये सुरु आहे. या सामन्यात ज्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज 40.4 षटकांत फक्त 78 धावांवर गारद झाला, त्याच खेळपट्टीवर इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. लीड्समध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी केल्यावर भारतीय संघ पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय विराट कोहलीच्या चांगलाच अंगलट आला की काय असे म्हटले जात आहे. परंतु, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने विराटच्या या निर्णयाचा बचाव केला आहे.
वास्तविक, इंग्लंडमधील गेल्या आठ सामन्यांनंतर विराट प्रथमच नाणेफेक जिंकला होता. त्याने खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्याचा डाव उलटला. रोहित शर्मा 19 आणि अजिंक्य रहाणे 18 व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाज दुहेरी अंक गाठू शकला नाही. त्याचवेळी सलामीवीर केएल राहुलसह तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.
भारताच्या तीन विकेट 21 धावांवर पडल्या होत्या. पहिल्या तीन फलंदाजांना जेम्स अँडरसनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि बाकीचे फलंदाज क्रेग ओव्हरटन आणि सॅम करन यांनी बाद केले. भारतीय संघ 78 धावावर सर्वबाद झाला. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
सामन्यानंतर रिषभ पंतने कोहलीच्या निर्णयाचा बचाव करताना म्हटले की, “नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा होता असे मला वाटत नाही. आम्ही कोणताही निर्णय घेतो, आम्ही तो एक संघ म्हणून घेतो. जर आम्ही एकदा ठरवले की, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, तर आम्ही शेवटपर्यंत या निर्णयासोबत असतो आणि त्याचे समर्थन करतो. होय, आम्ही आणखी चांगले करू शकलो असतो, पण आम्ही आत्ता नाणेफेक करण्याबद्दल विचार करत राहू शकत नाही.”
पंत पुढे म्हणाला, “हा खेळाचा भाग आहे. एक फलंदाज म्हणून, तुम्हाला दररोज तुमचे १०० टक्के द्यायचे आहे, पण असे नेहमीच घडते असे नाही. सकाळी खेळपट्टी थोडी सॉफ्ट होती. त्यांनी चांगल्या भागात गोलंदाजी केली. आम्ही यापेक्षा चांगले करू शकलो असतो, पण त्यातून आपण त्यातून शिकू आणि पुढे जाऊ. क्रिकेटपटू म्हणून आपण एवढेच करू शकतो की, तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता आणि सुधारता.”
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडच्या चाहत्यांचे निंदनीय कृत्य; सिराजवर फेकून मारला बॉल, रिषभ पंतने दिली घटनेची माहिती
फलंदाजीमध्ये ९९.९४ची जबरदस्त सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना ‘या’ गोलंदाजानी दिला सर्वाधिक त्रास
भारतीय संघ अडचणीत, पण मोहम्मद शमीने केलाय ‘मोठा’ विक्रम; कपिल देव, कुंबळेच्या पंक्तीत स्थान






