भारताचा शैलीदार फलंदाज रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. रोहितने आज ३५व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने त्याला अनेक आजी-माजी खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर सहकारी खेळाडूंनी देखील त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
यातच समावेश झाला आहे भारताचा स्फोटक फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचा. त्याने देखील ट्विटरवरून रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र या शुभेच्छा देतांना त्याने लिहिलेला मेसेज पाहून अनेकांना आपले हसू आवरले नाही.
पंतने दिल्या मजेशीर शुभेच्छा
रोहित शर्मा आणि रिषभ पंत सध्या सुरू असलेल्या आयपीएल मध्ये खेळत आहेत. यात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून तर रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळतो आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू आपापल्या संघांचे कर्णधारपद देखील सांभाळत आहेत. याच आयपीएलचा संदर्भ देत पंतने रोहितला मजेशीर शुभेच्छा दिल्या आहेत.
रिषभ पंतने ट्विट करत रोहितला शुभेच्छा देतांना म्हंटले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहित भैय्या. मी आशा करतो की येणाऱ्या वर्षात तुम्ही खूप सार्या धावा कराव्यात. अर्थात दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध वगळता.” पंतने शुभेच्छा देतांना देखील केलेली ही गंमत बघून अनेक चाहत्यांनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता रोहित शर्मा याला काय प्रत्युत्तर देणार, हे बघणे देखील उत्सुकतेचे असेल.
Happy birthday bhaiya ji @ImRo45 !Hope you have a year filled with runs, expect against @DelhiCapitals 😜😜 🎂 pic.twitter.com/wXIUmre24p
— Rishabh Pant (@RishabhPant17) April 30, 2021
पंत आणि रोहित आयपीएल मध्ये व्यस्त
दरम्यान, रोहित शर्मा आणि रिषभ पंत हे दोघेही सध्या आयपीएल मध्ये व्यस्त आहेत. रोहित शर्मा नेतृत्व करत असलेली मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात काहीसा संघर्ष करतांना दिसून आली आहे. मात्र कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरूद्ध विजय मिळवत त्यांची गाडी रूळावर आल्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे पंत पहिल्यांदाच दिल्ली कॅपिटल्ससाठी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतो आहे. मात्र त्याने आत्तापर्यंत तरी उत्तम कामगिरी केली आहे. दिल्लीने खेळलेल्या ७ सामन्यात ५ विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान सद्यस्थितीत काबीज केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
शर्माजी झाले ३४ वर्षांचे! शुभेच्छांचा होतोय वर्षाव, पाहा काही खास पोस्ट
अशी ५ कारणं, ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार