भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतने (Rishbh Pant) पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर असतानाही, मोठ्या जिद्दीने पहिल्या डावात अर्धशतक झळकावलं. त्यानंतर बेन स्टोक्सच्या (Ben Stocks) नेतृत्वाखालील इंग्लंडने भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 358 धावांवर संपवला. पंत 37 धावांवर खेळत असताना उजव्या पायाला दुखापत झाली आणि तो रिटायर्ड हर्ट झाला होता. पण, त्यानंतरही त्याने पुन्हा मैदानात येत दुखापतीवर मात करत 75 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या. त्याने वेदना झेलत धाडसी खेळी केली.
दरम्यान, रिषभ पंतने (Rishbh Pant) आणखी एक जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. तो परदेशात एका विशिष्ट देशात सर्वाधिक वेळा 50+ धावा करणारा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे. इंग्लंडमध्ये पंतचं हे नववं 50+ अर्धशतक आहे. त्याच्या आधी कुठल्याही यष्टिरक्षकाने परदेश दौऱ्यात एखाद्या देशात इतक्या वेळा 50+ धावा केल्या नव्हत्या. पंतच्या आधी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) इंग्लंडमध्येच आठ वेळा ही कामगिरी केली होती. यापैकी चार अर्धशतकं 2008-09 च्या दौऱ्यात आणि उर्वरित चार 2014 च्या दौऱ्यात केली होती.
पंतने 69 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि त्याच्या 54 धावांच्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले. चालू मालिकेत पंतने आतापर्यंत चार कसोटी सामन्यांतील 7 डावांमध्ये 68.43 च्या सरासरीने 479 धावा केल्या आहेत.






