आयपीएल 2024 मध्ये गुरुवारी (28 मार्च) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी शानदार पराभव केला. संजू सॅमसनच्या संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो रियान पराग. परागनं 45 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी खेळली. या शानदार खेळीसाठी या युवा फलंदाजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बोलताना राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजानं आपल्या भावना व्यक्त केल्या. रियान पराग म्हणाला, माझी आई यावेळी इथे आहे. तिनं माझा संघर्ष जवळून पाहिला आहे. विशेष म्हणजे गेल्या 3-4 वर्षात खूप संघर्ष केला. रियान यावेळी खूपच भावूक दिसत होता.
रियान पराग म्हणाला की, “माझा देशांतर्गत हंगाम खूप छान होता. ज्याचा फायदा मला आयपीएलमध्ये होत आहे. मला माहित आहे की संघातील टॉप-4 फलंदाजांपैकी एकाला 20 षटकं खेळावी लागतील. याशिवाय या विकेटवर चेंडू खाली राहत होता, मात्र संजू भैयानं पहिल्याच सामन्यात अप्रतिम खेळी केली होती. मी सतत मेहनत करत होतो. गेले 3 दिवस मी अंथरुणावर होतो, सतत पेन किलर घेत होतो, पण आज मी माझ्या टीमसाठी योगदान दिलं. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”
राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव करून आयपीएल 2024 मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनं 20 षटकांत 5 बाद 185 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 173 धावा करू शकला.
एकेकाळी राजस्थान रॉयल्सचा संघ 7.2 षटकांत 3 बाद 36 धावांवर झुंजत होता. मात्र त्यानंतर रियान परागनं आपल्या शानदार खेळीनं संघाला संकटातून बाहेर काढलं. परागनं 45 चेंडूत 84 धावांच्या तुफानी खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले. यासह परागच्या नावे आयपीएल 2024 मध्ये दोन सामन्यात 127 धावा झाल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहलीला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत रियान परागनं टाकलं विराट कोहलीला मागे, पर्पल कॅपवर ‘या’ विदेशी खेळाडूचा कब्जा
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा पराभव, ऋषभ पंतच्या संघाच्या पराभवाचं कारण काय?
“धोनीला पाहताच मोहित शर्मानं…”, मैदानावरील व्हिडिओ व्हायरल, तुम्हीही एकदा पाहाच