रायपूर येथील वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आजपासून (५ मार्च) सुरू झालेल्या ‘रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज’ च्या उद्घाटनाच्या सामन्यात इंडिया लिजेंड्स संघाने बांगलादेश लिजंड्सवर १० गडी राखून मोठा विजय मिळवला. भारताचा आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग या सामन्याचा नायक ठरला.
भारतीय गोलंदाजांची किफायतशीर गोलंदाजी
या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद रफीकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर नजिमुद्दिन व जावेद ओमर यांनी ८ षटकांमध्ये ५९ धावा काढून बांगलादेशला चांगली सुरुवात दिली.
मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्याचे पारडे फिरविले. प्रज्ञान ओझा, विनय कुमार व युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन तर युसुफ पठाण व मनप्रीत गोनी यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला. बांगलादेशचा संपूर्ण डाव १९.४ षटकांमध्ये १०९ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशसाठी सलामीवीर नजिमुद्दिनने सर्वाधिक ४९ धावा बनविल्या.
सेहवागची विस्फोटक खेळी
बांगलादेश लिजेंड्सने दिलेल्या ११० धावांच्या आव्हानास समोर वीरेंद्र सेहवागने आपल्या चिरपरिचित अंदाजात सुरुवात केली. बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद रफीकच्या पहिल्याच षटकात १९ धावा लुटत त्याने भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये अर्धशतक साजरे केले. हे स्पर्धेचे आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक आहे.
इंडिया लिजेंड्सने ११० धावांचे आव्हान अवघ्या १०.१ षटकात पूर्ण केले. सेहवागने १० चौकार व ५ षटकारांचा सहाय्याने ३५ चेंडूमध्ये नाबाद ८० तर, कर्णधार सचिन तेंडुलकरने २६ चेंडूमध्ये नाबाद ३३ धावांची खेळी केली. सामनावीराचा पुरस्कार सेहवागलाच देण्यात आला.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले स्पर्धेचे उद्घाटन
मागील वर्षी कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. मागील वर्षी मुंबई आणि पुणे येथे खेळली गेलेली ही स्पर्धा, यावेळी रायपूर येथे होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते झाले. नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षे विषयी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पंतने शतक पूर्ण करतात कौतुक करण्यासाठी बाल्कनीत पळत आला कर्णधार कोहली, पाहा व्हिडिओ
रिषभ पंतचा कहर! स्मिथला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये आला दुसऱ्या स्थानी
भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा पंत दुसराच यष्टीरक्षक, अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज






