गोवा। लिव्हरपूल आणि मँचेस्टरमध्ये अनेक डर्बींंचा साक्षीदारच नव्हे तर शिल्पकार ठरलेले रॉबी फाऊलर आता कोलकाता डर्बीसाठी सज्ज झाले आहेत. सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) पहिल्यावहिल्या कोलकाता डर्बीमध्ये शुक्रवारी( एटीके मोहन बागानविरुद्ध ते एससी ईस्ट बंगालला मार्गदर्शन करतील.
भारतामधील कारकिर्द सुरु करण्यासाठी फाऊलर यांना याहून सरस व्यासपीठ मिळू शकणार नाही. खेळाडू म्हणून त्यांची कारकिर्द डर्बीच्या अविस्मरणीय क्षणांना वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. पहिल्याच मर्सीसाईड डर्बीमध्ये त्यांनी लिव्हरपूलतर्फे एव्हर्टनविरुद्ध केलेला गोल निर्णायक ठरला. याशिवाय मँचेस्टर डर्बीमध्ये त्यांनी मँचेस्टर सिटीतर्फे खेळताना मँचेस्टर युनायटेडविरुद्ध अनेक वेळा गोल केले आहेत. याशिवाय त्यांनी लिड्स युनायटेडचे काही काळ प्रतिनिधीत्व करताना मँचेस्टर युनायटेडविरुद्धच्या पेनाईस डर्बीत एका गोलची चालही रचली.
या पार्श्वभूमीवर ते इतर कोणत्याही डर्बीइतकाच इतिहास असलेल्या आणि चुरशीने खेळल्या जाणाऱ्या मुकाबल्यासाठी सज्ज झाले आहेत. अर्थात यावेळी ते मैदानावर नव्हे तर ईस्ट बंगालच्या डगआऊटमध्ये असतील. डर्बीच्या दडपणाला सामोरे जाण्यासाठी आपल्या प्रशिक्षकांइतके सक्षम असे फार थोडे जण असल्याचे ईस्ट बंगालच्या चाहत्यांना समजेल.
फाऊलर यांनी सांगितले की, हे सामने भव्य असेच असतात. चाहत्यांसाठी आणि अर्थातच खेळाडूंसाठी त्यांचे मोल फार मोठे असते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही त्यात सहभागी व्हायचे आणि तुमचे डोके वापरून खेळायचे असते. तुम्ही प्रयत्नपूर्वक खेळायला हवे आणि समंजस दृष्टिकोन ठेवायला हवा. अशा प्रकारच्या सामन्यांत खेळाडूंनी भावनेच्या भरात वाहवत जाऊन चालत नसते. तसे झाल्यास तुम्ही प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठी मैदानावर झेप टाकता किंवा अवास्तव उत्साह दाखविता. त्यामुळे या डर्बीत तुम्ही प्रयत्नपूर्वक खेळायला हवे आणि समंजस दृष्टिकोन ठेवायला हवा.
ही डर्बी आपल्यासाठी महत्त्वाची आहे असे फाऊलर यांना वाटते. याचे कारण अशा सामन्यांमुळे संघाला लय गवसण्याची प्रक्रिया सुरु होते. याशिवाय डर्बी हा मोसमातील पहिलाच सामना आहे. विजयी प्रारंभाचे महत्त्व त्यांना ठाऊक आहे.
फाऊलर यांनी सांगितले की, एटीके मोहन बागानविरुद्ध आम्ही खेळतो आहोत म्हणून हा सामना मोठा आहे असे नाही, तर हा संघ म्हणून हा आमची ही पहिलीच लढत आहे. हा सामना मोठ्या प्रतिष्ठेचा आहे. चाहत्यांसाठी याचे मोल मोठे आहे. भारतामधील ही एक सर्वांत भव्य अशी लढत आहे. त्यामुळे मैदानावर उतरून आमचा संघ कोणत्या प्रकारचा आहे हे दाखवून देण्याची संधी मिळाली आहे. अशा सामन्यांत आम्ही आमची ओळख दाखवू शकतो आणि आम्ही कोणत्या पद्धतीने सराव करतो आहोत हे सुद्धा सांगू शकतो.
मोसमपूर्व तयारी उशीरा सुरु झाल्यामुळे ही बाब आपल्या संघासाठी प्रतिकूल ठरेल असे फाऊलर यांना वाटते. पण म्हणून आपला संघ प्रेरणेत आणि खेळण्याच्या कार्यपद्धतीत कमी पडणार नाही असेही ते आवर्जून नमूद करतात. त्यांनी सांगितले की, मोहिम सुरु करण्याकरीता आमच्यासाठी हा एक अत्यंत खडतर असा सामना आहे. पूर्वतयारीच्या बाबतीत आम्ही सर्व संघांच्या तुलनेत पिछाडीवर आहोत. सामने खेळण्याच्या बाबतीतही आम्ही मागे आहोत. एटीके मोहन बागानने एक सामना खेळला आहे आणि आम्ही अजून एकही लढत खेळलेलो नाही. त्यामुळे मोसमाला प्रारंभ करताना आम्ही अनुभवात तुलनेने कमी आहोत. आम्ही कसा खेळ करू, आमचा संघ कोणत्या प्रकारचा आहे याचा कुणालाच अंदाज नाही. अशावेळी मैदानावर उतरून एक प्रकारे मापदंड निर्माण करणे आमच्या हातात आहे. आम्ही ते करू शकतो. याचे कारण आम्ही तयारीची पद्धत चांगली आहे. आमची संघभावना चांगली आहे. खेळाडूंचा दृष्टिकोन प्रथम दर्जाचा आहे यात शंका नाही. मोसमाचा प्रारंभ करण्यास आम्ही आतूर आहोत. प्रतिक्षेचा कालावधी दिर्घ ठरला आहे. आम्ही सर्व तयारी केली आहे. आम्ही इथपर्यंत आलो आहोत आणि आता सुरवात करण्यास सज्ज झालो आहोत.
संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमवर प्रेक्षक नसले तरी दूरवरूनही त्यांचा पाठिंबा जाणवू शकतो अशी भावना फाऊलर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्हाला किती चांगला पाठिंबा आहे हे माहित आहे. चाहते स्टेडियमवर येऊ शकत नाहीत हे आम्ही समजू शकतो. ते व्यक्तीशः नसतील, पण मनाने १२० टक्के तेथे असतील याविषयी मला कोणतीही शंका नाही. आम्हाला त्यांचे प्रोत्साहन जाणवेल. आम्हाला त्यांचे प्रेम जाणवेल. संघाचे कार्यदल तसेच एक संघ म्हणून आम्ही याबद्दल कृतज्ञ आहोत. हा पाठिंबा कायम राहील अशी आशा आहे. प्रेक्षक स्टेडियमवर परतू शकतील असा दिवस उजाडेल आणि तो येईपर्यंत आम्ही जे करण्याची गरज आहे ते शांतचित्ताने करीत राहू. आम्ही घालतो त्या एका विलक्षण जर्सीसाठीच नव्हे तर हा क्लब करतो त्या असंख्य गोष्टींसाठी प्रेरणास्थान असलेल्या प्रेक्षकांसाठी आम्ही खेळू.
फाऊलर यांना डर्बीचा सर्वोत्तम क्षण कोणता असा प्रश्न विचारला तर अनेक क्षणांमधून एका क्षणाची निवड करणे अवघड असल्याचे सांगतात. शुक्रवारी मैदानावर मनासारखे घडले तर अशा दिर्घ यादीत आणखी एका क्षणाची भर पडलेली असेल.
वाचा –
ऍडमच्या पेनल्टीवरील गोलमुळे मुंबईचा गोव्याला पराभवाचा धक्का
दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या कारकिर्दीवर एक नजर…
कहाणी मॅराडोनाच्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ ची…