इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. ९ एप्रिल रोजी या हंगामाची सुरुवात होणार असून चेन्नईत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सलामीचा सामना होणार आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या सर्व संघांनी मिनी ऑक्शनआधी खेळाडूंच्या रिटेन, रिलीज आणि ट्रेडची प्रक्रिया पूर्ण करुन घेतली होती.
यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने रॉबिन उथप्पाला राजस्थान रॉयल्समधून ट्रेड करत आपल्या ताफ्यात सहभागी केले होते. यानंतर उथप्पाने धोनीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.
प्रसिद्ध क्रिकेट वेबसाइट क्रिकइन्फोशी बोलताना उथप्पा म्हणाला की, “चेन्नईने मला ट्रेड केल्यानंतर संघ कर्णधार धोनीने मला कॉल केला होता. मी तुला सांगू इच्छितो की तुझी संघात निवड करण्याचा निर्णय मी घेतला नव्हता. हा संघ व्यवस्थापन आणि सर्वांच्या प्राधान्यानुसार घेण्यात आलेला निर्णय होता. यात संघाचे प्रशिक्षक आणि सीईओ या सर्वांच्या मतांचा समावेश होता, असे धोनी मला कॉलवर म्हणाला होता.”
“खरे तर, धोनीला असे वाटत नाही की कोणत्या खेळाडूने विचार करावा की स्वत: धोनीने आपली निवड केली आहे. त्याची इच्छा असते की प्रत्येकाने स्वत:च्या क्षमतेच्या जोरावर संघात सहभागी व्हावे. माझ्यावरही अशी वेळ आली तर मी सर्वांना म्हणेन की तुम्ही या, स्वत:ला सिद्ध करा आणि संघात दाखल व्हा. कारण सर्वांना असे वाटत आहे की धोनी चेन्नईत आहे म्हणून माझी निवड झाली आहे,” असे पुढे उथप्पाने सांगितले.
शेवटी बोलताना उथप्पा म्हणाला की, “धोनीचे हे विचार खरोखरच अतिशय शानदार आहेत. मी त्याच्या खरेपणाची प्रशंसा करु इच्छितो. मी चेन्नई संघात माझ्या कामगिरीच्या जोरावर स्थान मिळवले आहे. हीच तर धोनीची विशेषता आहे. तो प्रत्येक खेळाडूला त्याच्यातील प्रतिभेमुळे चेन्नई संघात जागा देतो.”
रॉबिन उथप्पाची आयपीएल कारकिर्द
अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज उथप्पा आजवर आयपीएलच्या पाच संघांसोबत खेळला आहे. यात मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पुणे वॉरियर्स इंडिया, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा समावेश आहे. आता एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई हा उथप्पाला आपल्या ताफ्यात सहभागी करणारा सहावा संघ ठरला आहे.
आयपीएल २०२०मध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्त्व करताना उथप्पाला विशेष कामगिरी करता आली नव्हती. त्याने या पूर्ण हंगामात १२ सामने खेळत केवळ १९६ धावा केल्या होत्या. दरम्यान त्याला एकही अर्धशतक करता आले नव्हते. असे असले तरी, त्याची पूर्ण आयपीएल कारकिर्दीतील आकडेवारी प्रशंसनीय आहे. २००८ पासून उथप्पाने आयपीएलमध्ये एकूण १८९ सामने खेळले आहेत. दरम्यान २४ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ४६०७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ८७ धावा या सर्वोच्च वैयक्तिक खेळीचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई सोडून आता मुंबईला रवाना होणार धोनी आणि कंपनी, ‘हे’ आहे कारण
मुंबई इंडियन्सचा आश्चर्यकारक निर्णय, केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूची संघात केली निवड