मुंबई । भारताचे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल या खेळाडूंना महेंद्रसिंग धोनीच्या आधी भारतीय संघात स्थान मिळवले होते. मात्र, त्यांना एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात आपल्या कामगिरीने छाप टाकता न आल्याने संघाबाहेर जावे लागले. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीने धडाकेबाज ‘एंट्री’करत फलंदाजी आणि यष्टीरक्षणात आपले कौशल्य जगाला दाखवून देत संघात स्थान पक्के केले. आज धोनी जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकापैकी एक आहे.
मागील विश्वचषकानंतर महेंद्रसिंग धोनी भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याचे संघातले स्थान अनिश्चित मानले जात आहे. याच दरम्यान पार्थिव पटेल आणि यष्टीरक्षक फलंदाज रॉबीन उथप्पा हे भारतीय संघात परतण्यास इच्छुक आहेत. यष्टीरक्षण आणि फलंदाजीमध्ये भूमिका निभाऊ शकतो, असेही पार्थिव म्हणाला.
पार्थिव पटेल पाठोपाठ रॉबिन उत्थप्पा हा देखील भारतीय संघात ‘कमबॅक’ करण्यास इच्छुक आहे. 2007 च्या टी- 20 विश्वचषकात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्यामते, धोनीच्या गैरहजेरीत तो भारतीय संघात यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडू शकतो. रॉबिन उत्थप्पाने देखील भारतीय संघाकडून खेळताना काही अविस्मरणी खेळी केल्या आहेत.
गतवर्षी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना 12 सामन्यात 282 धावा काढल्या. चांगल्या कामगिरीनंतरही केकेआरच्या संघाने त्याला रिलीज केले. भारतीय संघाची निळी जर्सी घालून पुन्हा भारतीय संघात येण्यासाठी तो मैदानावर प्रचंड मेहनत घेतोय. तसेच तो कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या गैरहजेरीत केएल राहुल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाची जबाबदारी उत्तम रित्या पार पडत आहे. त्यामुळे पार्थिव पटेल आणि रॉबीन उथप्पा यांना संघात संधी मिळेल याची शक्यता फार कमी आहे. राहुलच्या यष्टी रक्षणाबाबत बोलताना उथप्पा म्हणाला की, राहुल यष्टीरक्षणात चांगली कामगिरी करत आहे. त्याने अनेक कौशल्ये आत्मसात केली आहेत. त्याच्या यष्टीरक्षणात खूप सुधारणा दिसून येत आहे.
मधल्या फळीत फलंदाजी करणार्या रॉबिन उथप्पाने त्याचा अखेरचा सामना २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना दिसून आला. अखेरच्या टी-20 सामन्यात त्याने 25 चेंडूत 42 धावांची खेळी देखील केली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. स्थानिक सामने आणि आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत आहे.
आयपी रॉबिन उत्थप्पाने आयपीएलमध्ये 177 सामने खेळला असून त्यात 4411 धावा केल्या आहेत. त्यात 24 बहारदार अर्धशतकांचा समावेश आहे. रॉबिन मुंबई इंडियन्स, आरसीबी, पुणे वॉरियर्स, कोलकाता नाइट रायडर्स या संघाकडून आयपीएलचे सामने खेळला आहे. यंदाच्या वर्षात राजस्थान रॉयल्सच्या संघात त्याला स्थान मिळाले आहे.