स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर २०२१ च्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममधून बाहेर पडला आहे. याआधी तो ही स्पर्धा खेळणार असल्याची चर्चा होती. मात्र सोमवारी(२८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियन ओपनने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्याने या स्पर्धेतून माघार घेतली असल्याची अधिकृत माहिती दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकानुसार ६ वेळचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता फेडरर अजून पूर्ण तंदुरुस्त नसल्याने तो ही स्पर्धा खेळणार नाही.
त्याच्या गुडघ्यावर यावर्षी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे तो या वर्षी फेब्रुवारीपासून व्यावसायिक टेनिस खेळलेला नाही. मात्र त्याने नुकतीच सरावाला सुरुवात केली होती. त्यामुळे तो २०२१ हंगात खेळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र आता त्याने जरी सरावाला सुरुवात केली असली तरी तो पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याचे समजत आहे.
वीस ग्रँडस्लॅम विजेता फेडरर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन खेळले, अशी अपेक्षाही प्रसिद्धीपत्रकात व्यक्त करण्यात आली आहे. ३९ वर्षीय फेडरर राफेल नदालसह सर्वात यशस्वी पुरुष टेनिसपटू आहे. या दोघांनीही एकेरीत प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत. फेडरर सध्या जागतिक क्रमवारीत ५ व्या क्रमांकावर आहे.
All the best with your recovery @rogerfederer. Look forward to seeing you back at the #AusOpen in 2022. pic.twitter.com/M6L05zF50K
— #AusOpen (@AustralianOpen) December 28, 2020
ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ स्पर्धेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.