ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र भारतासाठी या स्पर्धेतून सलग दुसऱ्या दिवशी निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारताचा अव्वल टेनिसपटू रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारताची भिस्त आता युवा दिविज शरण आणि अंकिता रैना यांच्यावर आहे.
सरळ सेट्समध्ये पराभव
रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार बेन मैकलाचलन यांच्या जोडीला में जी सुंग नेम आणि मिन क्यू सोंग या कोरियन जोडीकडून पराभवाचा धक्का बसला. बोपण्णा आणि त्याच्या जपानच्या साथीदाराने कोरियाच्या वाईल्ड कार्ड धारक जोडीला एक तास १७ मिनिटे लढत दिली. मात्र त्यांना ४-६, ६-७ अशा सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.
बोपण्णाने पहिल्याच सेटमध्ये आपली सर्विस गमावली. त्याचा फायदा उचलत कोरियन जोडीने पहिला सेट ६-४ असा सहजतेने आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा आणि बेन मैकलाचलनने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र टायब्रेकरमध्ये गेलेल्या या सेटमध्येही बाजी मारत कोरियन जोडीने सामना आपल्या खिशात घातला.
लय मिळविण्यासाठी करावा लागला संघर्ष
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेपूर्वी रोहन बोपण्णाला विलगीकरणात राहणे, बंधनकारक होते. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर झालेला दिसून आला. दीर्घ काळाच्या विश्रांतीनंतर पुनरागमन करत असल्याने बोपण्णाला लय मिळवण्यात देखील अडचण येत होती.
मात्र आता बोपण्णाच्या या पराभवाने भारताच्या आव्हानाला काहीसा धक्का बसला आहे. अनुभवी खेळाडू पराभूत झाल्याने युवा खेळाडूंवर भारताची भिस्त आहे. पुरुष दुहेरीत दिविज शरण तर महिला दुहेरीत अंकिता रैना आपापल्या साथीदारांसह खेळताना दिसतील.
महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत पुनरागमन करेल
विजय हजारे ट्रॉफी २०२१ : या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात, ६ शहरात खेळणार ३८ संघ
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात होणार बदल? हा खेळाडू करू शकतो कसोटी पदार्पण