कोलकाता। भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात ईडन गार्डन्सवर ३ सामन्यांची टी२० मालिका (T20I Series) झाली. रविवारी शेवटचा टी२० सामना झालेल्या या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ३-० असा विजय मिळवला आणि वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला (Whitewash Opponents in T20I). याबरोबरच कर्णधार रोहित शर्माच्या नावावर खास विक्रम नोंदवले गेले आहेत.
खरंतर गेल्या ६ महिन्या भारतीय संघाच्या नेतृत्त्व गटात मोठे बदल पाहायला मिळाले. गेल्यावर्षी टी२० विश्वचषक झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याने भारताच्या टी२० संघाचे नेतृत्त्व सोडले, तर त्यानंतर काही वेळातच त्याच्याकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आले. दरम्यान, जानेवारी २०२२ मध्ये विराटने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचाही राजीनामा दिला. त्यामुळे तिन्ही क्रिकेट प्रकारांसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर टाकण्यात आली.
रोहितनेही ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. त्याने भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधारपद सांभाळल्यापासून त्याने न्यूझीलंड संघाला टी२० मालिकेत ३-० असे पराभूत केले आहे. त्यानंतर त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतही ३-० अशा फरकाने विजय मिळवला, तर आता त्याने वेस्ट इंडिजला टी२० मालिकेतही ३-० अशी धूळ चारली आहे.
धोनी-विराटला टाकले मागे
रोहितने यापूर्वी नियमित कर्णधराच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधारपदही सांभाळले होते. पण आता तो पूर्णवेळ आणि नियमित कर्णधार म्हणून नेतृत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहे. त्याने आत्तापर्यंत भारताचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये २५ सामन्यांत नेतृत्त्व केले आहे. यातील २१ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर ४ सामने पराभूत झाला आहे.
तसेच त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने ४ वेळा प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध निर्भेळ यश मिळवले आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिकवेळा व्हाईटवॉश देणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी (MS Dhoni) आहे. विराटने २ वेळा आणि धोनीने १ वेळा प्रतिस्पर्धी संघाला कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये व्हाईटवॉश दिला आहे.
त्याचबरोबर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात मिळवलेला विजय हा रोहित शर्मासाठी कर्णधार म्हणून मायदेशात मिळवलेला १४ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय होता. त्यामुळे तो मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० विजय मिळवणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने याबाबतीत विराट कोहली आणि एमएस धोनीला मागे टाकले आहे. विराटने भारतात १३ आणि धोनीने १० विजय कर्णधार म्हणून मिळवले होते. त्याचबरोबर रोहितचा हा कर्णधार म्हणून सलग ९ वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय देखील ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएमधून बीसीसीआयला मिळणार ५०० अब्ज रुपये? मोठ-मोठ्या कंपन्या शर्यतीत
व्यंकटेशच्या रूपात भारताला मिळाला टी२०चा ‘नवा फिनिशर’, हार्दिकसाठी बंद झाले पुनरागमनाचे रस्ते?
महागुरू द्रविडने कमी केला होता पदार्पणवीर आवेश खानवरचा दबाव, दिला होता ‘हा’ झक्कास मंत्र