कटक । भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात काल पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी २० त आपल्या १५०० धावा पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारा तो केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
याआधी असे भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीने केले आहे. तसेच रोहित टी २० क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करणारा जगातील १४ वा खेळाडू बनला आहे.
रोहित आजपर्यंत भारताकडून ६९ टी २० सामने खेळाला आहे. यात त्याने ३०.०४ च्या सरासरीने १ शतक आणि १२ अर्धशतकांसह १५०२ धावा केल्या आहेत. तसेच विराटने ५५ टी २० सामन्यात भारताकडून खेळताना १८ अर्धशतकाच्या मदतीने १९५६ धावा केल्या आहेत.
Congratulations to @ImRo45 on reaching 1,500 T20I runs, just the second Indian to reach the milestone after @imVkohli! #INDvSL pic.twitter.com/HsjcPhnLJP
— ICC (@ICC) December 20, 2017
काल झालेल्या टी २० सामन्यात रोहितने १७ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ९३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच रोहित विराटच्या अनुपस्थितीत संघाची धुराही सांभाळत आहे.
रोहित सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने या आधी झालेल्या श्रीलंकेविरुध्दच्याच वनडे मालिकेत मोहालीत झालेल्या दुसऱ्या सामन्यात विक्रमी द्विशतकी खेळी केली होती. हे त्याचे वनडेतील तिसरे द्विशतक होते. या मालिकेत भारताने २-१ ने विजय मिळवला होता.