लंडन। इंग्लंडविरुद्ध गुरुवारपासून (२ सप्टेंबर) सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे. ओव्हल स्टेडियमवर हा सामना सुरु असून रोहितने भारताच्या दुसऱ्या डावात शतक पूर्ण केले. यासह त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
या सामन्यात दुसऱ्या डावात रोहित सलामीला फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी करताना खराब चेंडूंचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६४ व्या षटकात मोईन अली विरुद्ध शानदार षटकार ठोकताना शतकाला गवसणी घातली. हे त्याचे कसोटीतील परदेशात केलेले पहिले शतक ठरले. याबरोबरच इंग्लंडमधील एकूण ९ वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. यासह त्याने अनेक दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहेत.
सर विव रिचर्ड्सशी बरोबरी
रोहितने इंग्लंडमध्ये ९ वे शतक करण्याबरोबरच महान क्रिकेटपटू सर विव रिचर्ड्स यांची बरोबरी केली आहे. इंग्लंडमध्ये पाहुण्या खेळाडूने (परदेशी) सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत रोहित रिचर्ड्स यांच्यासह आता संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. रिचर्ड्स यांनी देखील इंग्लंडमध्ये ९ शतकं केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर महान सर डॉन ब्रॅडमन यांचे नाव आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये ११ शतकं केली आहेत.
द्रविड, सचिनला टाकले मागे
रोहितने इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांना देखील मागे टाकले आहे. राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये ८ आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत, तर सचिन तेंडुलकरने ७ आंतरराष्ट्रीय शतकं केली आहेत.
सलामीवीरांमध्येही रोहितच ‘हिट’
इंग्लंडमध्ये ३९ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रोहितने त्याची सर्व ९ शतके सलामीला खेळताना केली आहेत. त्यामुळे तो इंग्लंडमध्ये पाहुण्या सलामीवीराने सर्वाधिक शतकं करण्याच्या यादीतही अव्वल क्रमांकावर आला आहे. त्याने गोर्डन ग्रिनिज यांच्या ८ शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने आणि ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने इंग्लंडमध्ये सलामीला खेळताना प्रत्येकी ५ शतकं केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पाकिस्तानविरुद्ध खेळताना माझे रक्त गरम व्हायचे’, सेहवागने सांगितल्या वनडे पदार्पणाच्या आठवणी
टी२० क्रमवारीत उलटफेर; बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला टाकले मागे, पाहा पहिल्या ५ क्रमांकांवर कोणते संघ