मंगळवारी (दि. 30 एप्रिल) ‘हिटमॅन’ अशी ओळख मिळवलेला भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्माचा 37वा वाढदिवस आहे. साल 2007 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून पदार्पण केलेल्या रोहित शर्माने मागील काही वर्षात सलामीवीर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याने आजपर्यंत त्याच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक विश्वविक्रम केले आहेत. यातील काही विश्वविक्रम असे आहेत, ज्यांना तोडणे जवळजवळ अशक्य आहे. अशा विक्रमांचा घेतलेला आढावा –
1. वनडेमध्ये 3 द्विशतके
रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वनडेमध्ये 3 द्विशतके केली आहेत. असा पराक्रम करणारा तो पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत वनडेमध्ये केवळ 8 खेळाडूंना द्विशतक करण्यात यश आले आहे. त्यातील रोहित व्यतिरिक्त अन्य 7 खेळाडूंनी केवळ एकदा द्विशतक केले आहे.
रोहितने पहिले द्विशतक 2 नोव्हेंबर 2013 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याने त्यावेळी 158 चेंडूत 209 धावांची खेळी केली होती. त्यानंतर त्याने 13 नोव्हेंबर 2014 ला श्रीलंकाविरुद्ध 173 चेंडूत 264 धावांची वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावांची खेळी केली. हे त्याचे दुसरे द्विशतक होते.
त्यानंतर 3 वर्षांनी त्याने 13 डिसेंबर 2017 ला श्रीलंकेविरुद्धच नाबाद 208 धावांची खेळी करत तिसरे द्विशतक केले. त्याच्या या वनडेतील 3 द्विशतकांचा विक्रम मोडणे सध्यातरी कोणत्याही क्रिकेटपटूसाठी कठीण आहे.
2. वनडेतील 264 धावांची सर्वोच्च खेळी
वनडेमध्ये रोहितने पहिल्या द्विशतक झळकावल्यानंतर 1 वर्षाने 13 नोव्हेंबर 2014 ला दुसरे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे खेळताना केले. त्यावेळी त्याने 173 चेंडूत 33 चौकार आणि 9 षटकारांच्या मदतीने 264 धावांची खेळी केली होती. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती.
रोहितने 264 धावांपैकी तब्बल 186 धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या. रोहितचा हा विक्रम देखील मोडणे अवघड आहे. कारण आत्तापर्यंत रोहित व्यतिरिक्त वनडेत द्विशतक करणाऱ्या खेळाडूंंनाही 240 धावांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.
3. एका विश्वचषकात ५ शतके
इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या 2019 विश्वचषकात रोहितने एक-दोन नव्हे तब्बल 5 शतके केली होती. याआधी कोणत्याच क्रिकेटपटूला एका विश्वचषकात 5 शतके करता आली नव्हती. रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध शतके केली होती. तसेच 5 शतकांसह त्या विश्वचषकात सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या.
4. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक शतके
रोहितने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक 4 शतके केली आहेत. त्याने 2015 ला टी20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा शतक केले. त्यावेळी त्याने 106 धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहितने 2017 ला श्रीलंकेविरुद्ध 118 धावांची शतकी खेळी केली होती. यानंतर त्याने 2018 ला वेस्ट इंडिज आणि इंग्लंड संघाविरुद्ध अनुक्रमे 111 आणि नाबाद 100 धावांची शतकी खेळी केली.
त्यामुळे रोहित हा टी20 मध्ये 4 शतके करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये कोणालाही 4 शतके करता आलेली नाही. रोहित पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, न्यूझीलंडचा कॉलीन मुन्रो, पाकिस्तानचा बाबर आझम, भारताचा सूर्यकुमार यादव, झेक रिपब्लिकचा सबावून दाविझी या खेळाडूंनी 3 शतके केली आहे.
5. आयपीएलची 5 विजेतेपदे जिंकणारा खेळाडू
खेळाडू म्हणून 6 पैकी 6 आयपीएलचे अंतिम सामने जिंकणारा रोहित शर्मा एकमेव खेळाडू आहे. रोहितने 2009 ला डेक्कन चार्जर्सकडून खेळताना पहिल्यांदा आयपीएलच्या विजेतेपदाची चव चाखली होती.
नंतर रोहित 2011पासून मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020ला आयपीएलचे विजेतेपदे जिंकली आहेत. खास गोष्ट म्हणजे या पाचही मोसमात रोहितने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे तो कर्णधार म्हणूनही आयपीएलची 5 विजेतेपदे मिळवणारा पहिला कर्णधार आहे.
रोहित व्यतिरिक्त केवळ 3 खेळाडूंनी आत्तापर्यंत खेळाडू म्हणून 4 आयपीएलची विजेतीपदे मिळवली आहेत. यात हरभजन सिंग, अंबाती रायुडू आणि युसूफ पठाण यांचा समावेश आहे.