भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळतो आहे. या मालिकेतील तीन सामने पार पडले असून यातील दोन सामन्यात इंग्लंडने तर एका सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. आज या मालिकेचा चौथा सामना खेळवला जाणार असून १-२ अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या भारताला मालिकेत आव्हान टिकवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे.
मालिकेतील तीनही सामन्यात भारताने अंतिम अकराच्या संघात बदल केले आहेत. आजही संघ व्यवस्थापन एक किंवा दोन बदल करण्याची शक्यता आहे. मात्र हे बदल होणार असले तरी भारताच्या अनुभवी खेळाडूंवर जबाबदारी घेत दमदार कामगिरी करण्याचे आव्हान असेल. याशिवाय भारताच्या दोन अनुभवी खेळाडूंच्या निशाण्यावर या सामन्यात दोन मोठे विक्रमही असतील.
मार्टिन गुप्तीलला मागे टाकण्याची रोहितला संधी
चौथ्या टी२० सामन्यात जर भारतीय सलामीवीर रोहित शर्माने ५२ धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या या यादीत दुसर्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलच्या नावे २८३९ धावा आहेत. रोहित ५२ धावा करताच त्याला मागे टाकू शकेल. रोहितने आजवर खेळलेल्या १०९ टी२० सामन्यात ३२.४१ च्या सरासरीने २७८८ धावा केल्या आहेत.
एक विकेट घेताच इम्रान ताहिरला मागे टाकेल चहल
भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने आत्तापर्यंत ४८ टी२० सामन्यात ६२ विकेट घेतल्या आहेत. यासह आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वाधिक विकेट घेणार्या गोलंदाजांच्या यादीत तो १७व्या स्थानी आहे. त्याने आजच्या सामन्यात एक विकेट घेतल्यास या यादीत तो दक्षिण आफ्रिकेचा लेगस्पिनर इम्रान ताहिरला (६३) मागे टाकेल. तसेच दोन विकेट घेतल्यास डेल स्टेनला (६४) आणि तीन विकेट घेतल्यास स्टुअर्ट ब्रॉडला (६५) मागे टाकेल.
दरम्यान, जर या दोन्ही खेळाडूंनी हे विक्रम गाठल्यास भारतीय संघासाठी ते सामना जिंकण्याच्या दृष्टीने सुचिन्ह असेल. रोहित शर्माने अर्धशतक केल्यास भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने कूच करू शकेल, तर चहलने विकेट घेतल्यास इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात भारतीय संघ यशस्वी होईल. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी आजच्या सामन्यात हे विक्रम करावेत, अशीच तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा असेल.
महत्वाच्या बातम्या:
शेर कभी बुढ़ा नहीं होता! सचिनच्या त्या षटकाराने चाहत्यांना आली २००३ विश्वचषकाची आठवण, पाहा व्हिडिओ
विराटला सचिनच्या फेअरवेलच्या सामन्यात होती द्विशतकाची संधी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बरोबर ९ वर्षांपुर्वी घेतला होता हा मोठा निर्णय