आयपीएल २०२१ मधील ३४ वा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना शेख झायेद क्रिकेट स्टेडियम अबुधाबी येथे होतोय. या सामन्यात केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून पुनरागमन करणारा मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या ३३ धावांच्या खेळी दरम्यान एका अविश्वसनीय विक्रमाला गवसणी घातली.
रोहितची छोटेखानी खेळी
चेन्नई विरुद्ध विश्रांती घेतलेल्या रोहितने या सामन्यातून पुनरागमन केले. त्याने क्विंटन डी कॉकसह मुंबईला ९.२ षटकात ७८ धावांची आक्रमक सलामी दिली. यामध्ये रोहितच्या ३३ धावांचा समावेश होता. रोहितने या खेळीदरम्यान ४ चौकार लगावले. सुनील नरीनच्या गोलंदाजीवर तो शुबमन गिलच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
रोहितची विक्रमी कामगिरी
रोहितने आपल्या छोटेखानी खेळीदरम्यान आईपीएल इतिहासातील एक असा विक्रम प्रस्थापित केला, जो यापूर्वी कुणीही करु शकले नाही. रोहितने डावातील अकरावी धाव घेताना केकेआरविरुद्ध १००० धावा पूर्ण केल्या. यासह तो कोणत्याही एका आयपीएल फ्रँचायझीविरुद्ध १००० धावा करणारा पहिलावहिला क्रिकेटपटू बनला आहे.
विशेष म्हणजे रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील केकेआर विरुद्धच्या पहिल्या सामन्यात खातेही खोलले नव्हते. तेव्हापासून त्याने आतापर्यंत केकेआरच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. रोहितने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या नाबाद १०९ केकेआर विरुद्ध केली आहे.
मुंबईची तडाखेबंद फलंदाजी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहित व डी कॉक यांनी ७८ धावांची सलामी धावांची सलामी दिली. रोहितच्या विकेटसह ही भागिदारी मोडली. रोहितनंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला सूर्यकुमार यादव ५ धावांवर स्वस्तात पव्हेलियनला परतला. त्यानंतर अर्धशतकवीर क्विंटन डी कॉकनेही आपली विकेट गमावली. तो ४२ चेंडूत ५५ धावा करत झेलबाद झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई वि केकेआर: डी कॉक- रोहितची धुमधडाका सुरुवात; अकराव्या षटकानंतर मुंबई एक बाद ८६
मुंबई पुनरागमनाच्या प्रयत्नात तर कोलकाताला सलग दुसऱ्या विजयाची आस, ‘अशी’ असेल संभाव्य अंतिम एकादश
मुंबईकरांना पुनरागमन करणं चांगलचं माहित आहे! संघनायक रोहतची केकेआरला चेतावणी, वाचा काय म्हणाला?