आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने-सामने आले आहेत. हा सामना दोन्ही संघांसाठी विजय पथावर परतण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. पंजाबने यंदाच्या हंगामात विजयाने सुरुवात केली होती मात्र त्यांनी पुढील तीनही सामने गमावले. तर मुंबईने खेळलेल्या चार सामन्यांपैकी त्यांना दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला.
त्यामुळे या सामन्यात विजयाच्या उद्दिष्टाने उतरलेल्या दोन्ही संघांमध्ये कडवी लढत होण्याची अपेक्षा आहे. याच दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक खास रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. या सामन्यात फलंदाजीसाठी उतरताच त्याच्या नावे हा रेकॉर्ड झाला.
द्विशतक केले पूर्ण
आजच्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यामुळे मुंबईकडून क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरले. यावेळी रोहित शर्माने त्याचे खास द्विशतक पूर्ण केले. आजचा डाव हा रोहित शर्माचा आयपीएल मधील फलंदाजी केलेला २००वा डाव ठरला.
असे करणारा तो आयपीएल मधील पहिला खेळाडू ठरला. त्याच्या मागे या यादीत सुरेश रैना असून त्याने आयपीएल मध्ये १९२ डावात फलंदाजी केली आहे. तिसर्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली असून त्याने १८८ डावात फलंदाजी केली आहे. तर चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आहे, ज्याने १८५ डावात फलंदाजी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक डावात फलंदाजी केलेले खेळाडू –
१) रोहित शर्मा – २००*
२) सुरेश रैना – १९२
३) विराट कोहली – १८८
४) एमएस धोनी – १८५
दरम्यान, आजच्या सामन्यात रोहितने अर्धशतक ठोकत आपला दोनशेवा डाव साजरा केला. अडखळत सुरुवात झाल्यावर रोहितने संयमी फलंदाजी करत मुंबईचा डाव सावरला. आता त्याने हा फॉर्म पूर्ण आयपीएलमध्ये कायम राखावा, अशी अपेक्षा मुंबईच्या संघाला असेल.
महत्वाच्या बातम्या:
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला वार्षिक करार, बड्या खेळाडूंना मिळाला डच्चू
धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ