साल २००७ टी२० अंतिम सामन्यात भारतीय संघ काही खूप चांगल्या स्थितीत नव्हता. गंभीरच्या शानदार ७५ धावा निघूनही भारत सन्मानजनक धावसंख्या गाठण्याबाबतीत संभ्रम होता. पण दोन सामने नवखा तो मैदानात आला आणि शेवटच्या षटकामध्ये १६ चेंडूत ३० धावा ठोकत संघाला दीडशेच नव्हे तर १६०च्या आसपास पोहोचवला. आज त्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जवळपास १४ वर्ष होत आहेत. त्याने त्यानंतर आत्तापर्यंत टी२० मध्ये चार शतके केली आहेत. पण ती खेळी माझ्या मते त्याची सगळ्यात अंडररेटेड खेळी आहे. अंतिम सामना, कमी अनुभव असताना अशी छोटेखानी पण महत्त्वाची खेळी खेळणारा खेळाडू म्हणजे रोहित शर्मा. आज त्याचाच वाढदिवस.
विराट कोहलीच्या आधी संघात आलेला हा गुणवत्तेत काकणभर सरसच होता, म्हणूनच तो कमी अधिक धावा काढूनही संघात बऱ्यापैकी स्थिर होता. ती उपजत गुणवत्ता उजेडात यायला २०१३ साल उजडावं लागलं. मधल्या फळीत म्हणून संघात कायम खेळत असणाऱ्या रोहितला सलामीला फलंदाजी करण्याची संधी देण्यात धोनी आणि निवडसमितीचा खूप मोठा वाटा होता. खरंतर ती त्याच्या कारकिर्दीमधली दुसरी फेजच सुरू झाली होती. पहिली फेज त्याच्या कॅलिबरच्या अनुशंगाने निराशाजनक होती. सहा वर्षात त्याने केवळ दोन शतकं आणि १४ अर्धशतकच केली होती. त्यात नजरेत भरणारी, लक्षात राहणारी खेळी म्हणजे २००८ सालची सीबी सिरीजचा पहिला अंतिम सामना. ८७-३ अशा परिस्थितीत असताना हा मुंबईकर रोहित दुसऱ्या मुंबईकर सचिनला साथच देत नाही तर संयमी ६६ धावा काढतो. १२३ धावांची भागीदारी रचतो. कुठेतरी तेव्हाच त्याच्यातला ‘स्पार्क’ दिसला होता आणि दोन मुंबईकर खेळाडू सिडनीचं मैदान गाजवत होते हीच गोष्ट जास्त सुखावणारी होती.
सलामीला फलंदाजी करायच्या आधीचा आणि सलामीला आल्यानंतरच्या रोहितमध्ये कमाल खान आणि शाहरूख खान इतका फरक पडला. सहा वर्षात दोन शतकं कुंथत काढणाऱ्या रोहितने पुढच्या सहा वर्षात किंवा आत्तापर्यंत २६ शतकं ठोकलीयेत. पुर्वीच्या काळी याला संघात घेतला की अनेकांच्या कपाळावरच्या रेषा मोजता यायच्या. पण टीकाकारांना या मुंबईकराने सुध्दा शांतपणे आपल्या बॅटनेच उत्तर दिले.
रोहित शर्मा कदाचित एकमेव खेळाडू असावा ज्याची अर्धशतक झाल्यावरच लोकं शतक नाही तर द्विशतकाची अपेक्षा करतात. वाट बघतात. लोकांचं पण काही चूक नाही आहे. अनेक दिग्गजांना एक द्विशतक जमलं नाही, काही अन्वरसारखे जवळ येऊन नॉट आऊट राहिले/आऊट झाले. पण याने तीन द्विशतकं ठोकलीत. आणि सध्या तो ज्या फॉर्ममध्ये आहे त्यामुळे अजून एखादं द्विशतक लागलं तर नवल वाटायला नको. पहिलं द्विशतक पहिलं असल्याने,सीरीज डिसाईडरला काढल्याने. दुसरं दुखापतीतुन कमबॅक केल्यानंतर कोलकत्त्यातलं आणि तिसरं मोहालीतलं स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवशी. त्याचं प्रत्येक द्विशतक आपापल्या परीने खास होतं, आहेच.
टी२०, वनडेमध्ये भारतीय सर्वोत्तम सलामीवीरांची यादी केली तर रोहितचा नंबर फार वरचा लागत असला. तरीसुध्दा कसोटीमध्ये पदार्पणाच्या मालिकेत सलग दोन शतकं करूनही त्याची जागा आत्तापर्यंत स्थिर नव्हती. पण २०१९ हे साल वैयक्तिक पातळीवर त्याच्यासाठी धमाकेदार ठरलं होतं त्यात आणखी एक गोष्टींची भर पडली ती म्हणजे कसोटीतही त्याला सलामीला येण्याची संधी मिळाली. या वर्षात ९० च्या आसपास सरासरीने धावाही काढल्या आहेत आणि भविष्यात अजुनही मोठ्या, रेकॉर्डब्रेकिंग खेळी पहायला मिळू शकतात..
साल २०१९ वरून आठवलं, हे वर्ष त्याच्यासाठी खुप महत्त्वाचे, अनेक चांगल्या घटननांनी भरलं होतं. कसोटीत सलामीला तर संधी मिळालीच, याशिवाय तो चार विजेतेपद जिंकणारा पहिला आयपीएल कर्णधार बनला. ही तर सुरुवात होती. नंतर विश्वचषकात जो राडा घातलाय तो निव्वळ अफलातून होता. एकाच विश्वचषकामध्ये पाच शतकं काढून नवा विक्रम प्रस्थापित केला. तेंडुलकरच्या सहा शतकांच्या विक्रमांशी बरोबरी (केवळ दोन वल्डकपमध्ये)साधली. त्या विश्वचषकातील कामगिरीनंतर अनेक विरोधकांना आपल्या समर्थकांमध्ये बदललंय. मी ही त्यातलाच एक.
अनेकदा त्याच्यावर तो आळशी आहे बेफिकीर आहे अशी टीका केली जाते. गौरव कपूर म्हणतो त्याप्रमाणे विराट रोबोट आहे, तर रोहित कलाकार. तो जर कलाकार असेल तर कोण सांगावं त्याच्यासाठी हे कुंचला आणि रंगच असतील.
महत्त्वाच्या बातम्या –
– खेळाडू म्हणून 6 पैकी 6 आयपीएल फायनल जिंकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू । HBD Rohit Sharma
– रोहित होता मधल्या फळीतील फलंदाज, ‘या’ सामन्यात मिळाली सलामीला संधी आणि पुढे घडला तो इतिहास… । HDB Rohit
– रोहित शर्माचा 37वा वाढदिवस, जाणून घ्या टीम इंडियाच्या कर्णधाराची एकूण संपत्ती किती? वर्षाला किती रुपये कमावतो ‘हिटमॅन’?