नुकतीच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले आणि पहिल्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. तर न्यूझीलंड संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. ही स्पर्धा झाल्यानंतर बुधवारपासून (१७ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही बलाढ्य संघ टी-२० मालिकेत आमने सामने येणार आहेत. या मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. तसेच मोठमोठे विक्रम देखील होताना पाहायला मिळणार आहेत. अशातच रोहित शर्माकडे देखील एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, केवळ ३ फलंदाज आहेत ज्यांना ३ हजारपेक्षा अधिक धावा करण्यात यश आले आहे. ज्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि मार्टिन गप्टील यांचा समावेश आहे. विराट कोहली या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने ८७ डावात ५२ च्या सरासरीने ३२२७ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याला न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
तसेच न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टील ३१४७ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. मार्टिन गप्टीलने १०५ डावात ३२ च्या सरासरीने ३१४७ धावा चोपल्या आहेत. या दरम्यान त्याने २ शतक आणि १८ अर्धशतक झळकावले आहेत. मार्टिन गप्टील या मालिकेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येऊ शकतो. जर त्याने या मालिकेत ८१ धावा केल्या तर, तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
रोहित शर्मा मोडणार विराट कोहलीचा विक्रम
भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्माने १०८ डावात ३३ च्या सरासरीने ३०३८ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ४ शतक आणि २४ अर्धशतक झळकावले आहेत. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या रोहित शर्माकडे विराट कोहलीला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे. त्याने या मालिकेत १९० धावा केल्या की तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीला मागे टाकत अव्वलस्थान मिळवू शकतो. तसेच अवघ्या १०९ धावा करताच तो मार्टिन गप्टीलला मागे टाकत दुसरे स्थान देखील मिळवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड संघ राहणार नाही क्वारंटाईन, ‘हे’ आहे कारण