रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक 2022 सुपर-4 फेरीतील श्रीलंकेविरुद्धचा करा अथवा मरा सामना गमावला आहे. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सुपर-4 सामन्यातही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सलग 2 पराभवांसह भारताच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघाकडे दीपक हुड्डा याच्या रूपात सहाव्या गोलंदाजाचा पर्याय उपलब्ध होता. तरीही कर्णधार रोहित शर्मा याने त्याचा वापर करून घेतला नाही. आता रोहितने यामागील कारण स्पष्ट केले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंत रोहितने सहाव्या गोलंदाजी पर्यायाबद्दल म्हटले की, “आमच्याकडे गोलंदाजांचे 6 पर्याय आहेत. परंतु मी सांगितल्याप्रमाणे आम्ही 5 गोलंदाजांना आजमावणार आहोत. आम्हाला हा प्रयोग करून पाहायचे आहे की, त्याचे परिणाम कसे मिळतात. श्रीलंकेविरुद्ध नक्कीच आमच्याकडे हुड्डाचा गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध होता. परंतु खेळपट्टीवर श्रीलंकेचे दोन उजव्या हाताचे फलंदाज खेळत होते. त्यामुळे मी त्याप्रसंगी हुड्डाला गोलंदाजीसाठी पाठवले नाही. कारण आम्हाला विकेट काढायच्या होत्या.”
“युझवेंद्र चहल आणि आर अश्विन हे आमचे जे आक्रमक फिरकीपटू आहेत, मला त्यांच्याकडून गोलंदाजी करून घ्यायची होती. जर आम्हाला लवकर विकेट मिळाली असती, तर आमची योजना होती की, हुड्डाला गोलंदाजीला आणायचे. परंतु मलाही माहितीय की, गोलंदाजीसाठी 6 पर्याय असणे चांगले असते. आम्ही बरेचसे सामने 6 पर्यायांसह खेळले आहेत. जेव्हाही आम्ही विश्वचषकात खेळू, तेव्हा आमचा विचार 6 गोलंदाजी पर्याय संघात असावेत, हाच असेल,” असेही रोहित म्हणाला.
दरम्यान भारत विरुद्ध श्रीलंका या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 173 धावा फलकावर लावल्या. भारताकडून कर्णधार रोहितने एकाकी झुंज दिली. 41 चेंडू खेळताना त्याने 72 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 5 चौकारही मारले. त्याच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव 34 धावा करू शकला. प्रत्युत्तरात सलामीवीर पथुम निसांका (52 धावा) आणि कुसल मेंडिस (57 धावा) यांच्या खेळींच्या जोरावर श्रीलंकेने 1 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या विजयासह श्रीलंकेने अंतिम सामन्यातील त्यांची जागा निश्चित केली आहे.