भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेनं दिलेल्या 231 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. मैदानावर येताच त्यानं दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकला. या डावात रोहितनं 9 धावा पूर्ण करताच सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 हजार धावांचा आकडा गाठला. यासह तिन्ही फॉरमॅटमध्ये सलामी करताना 15 हजार धावांचा आकडा गाठणारा तो तिसरा भारतीय आणि 10 वा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला आहे.
रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 333 वा सामना होता. त्यानं 352व्या डावात ही कामगिरी केली आहे. त्याच्या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं सलामीवीर म्हणून सर्वात जलद 15 हजार धावा केल्या होत्या. सचिननं 331 डावात ही कामगिरी केली होती. रोहित शर्मानं 2009 साली सलामीवीर म्हणून पहिला सामना खेळला होता. त्यानंतर त्यानं कधीही मागे वळून पाहिलं नाही. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी सलामीवीर म्हणून खेळला आहे. रोहितनं आता टी20 क्रिकेटला अलविदा केलं असलं तरी तो वनडे आणि टेस्टमध्ये खेळत राहणार आहे.
रोहित शर्मापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी भारतासाठी ही कामगिरी केली आहे. या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर सेहवागचं नाव आहे, ज्यानं भारताकडून सलामीला 321 सामने खेळताना 15758 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकरनं 346 सामन्यांत 15335 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावत संघाला दमदार सुरुवात करून दिली. हे त्याचं एकदिवसीय कारकिर्दीतील 56 वं अर्धशतक होतं. रोहित 47 चेंडूत 58 धावा करून बाद झाला. आपल्या या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 3 षटकार लगावले.
हेही वाचा –
कर्णधार रोहित शर्मा बनला ‘सिक्सर किंग’, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुणालाही मोडता येणार नाही हा विक्रम!
अति घाई, पव्हेलियनमध्ये नेई…! श्रीलंकेचा फलंदाज बाद नसतानाही माघारी परतला, नेमकं काय घडलं?
पाच वर्षांनंतर वनडे संघात पुनरागमन, पहिली विकेट मिळवण्यासाठी क्रिकेटरला 55 महिने पाहावी लागली वाट