आयपीएल 2025च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयाचा हिरो रोहित शर्मा होता. हिटमॅनसाठी हा हंगाम खास नसला, तरी त्याने दाखवून दिले की, तो मोठ्या सामन्यांचा मोठा खेळाडू आहे. रोहितने 81 धावांची खेळी करत केवळ संघाची भक्कम सुरुवातच केली नाही, तर सामन्याचं चित्रही बदलून टाकलं. या खेळीदरम्यान त्याने आपल्या आयपीएल प्लेऑफ कारकिर्दीतले तिसरे अर्धशतक झळकावले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. एलिमिनेटरमध्ये सामनावीर झाल्यानंतर रोहित शर्माने 3 मोठे विक्रम केले.
रोहित शर्मा आता आयपीएलच्या इतिहासातील एकमेव फलंदाज आहे ज्याने एलिमिनेटर आणि अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. गुजरात विरुद्ध एलिमिनेटरमध्ये हा पुरस्कार जिंकण्यापूर्वी त्याने आयपीएल 2015च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ही कामगिरी केली होती.
यासह, रोहित शर्मा प्लेऑफमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा तिसरा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. हिटमॅनने 38 वर्षे 30 दिवसांच्या वयात हा पुरस्कार जिंकला. अनिल कुंबळे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तर ऑस्ट्रेलियाचा ब्रॅड हॉग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएल प्लेऑफमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारे सर्वात वयस्कर खेळाडू-
38 वर्षे 219 दिवस – अनिल कुंबळे
38 वर्षे 144 दिवस – ब्रॅड हॉग
38 वर्षे 030 दिवस – रोहित शर्मा*
आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्माचा हा 21वा सामनावीर पुरस्कार आहे, आता त्याच्या पुढे फक्त दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 25 सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर आहे, तर गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 22 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.






