भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा दुखापतीमुळे होऊ घातलेल्या टी20 विश्वचषकात खेळू शकणार नाही. भारतीय संघासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. त्याचवेळी आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्वतः पुढे येत प्रथमच बुमराहच्या दुखापतीविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
टी20 विश्वचषकासाठी नुकतीच सर्व कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्माला बुमराहच्या दुखापतीविषयी प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“बुमराह नक्कीच आमचा प्रमुख खेळाडू आहे. हा विश्वचषक नक्कीच सर्वांसाठी खूप महत्त्वाचा बनलाय. बुमराह संघात असायला हवा होता. परंतु, जितका विश्वचषक महत्त्वाचा आहे तितकीच त्याची कारकीर्द देखील महत्त्वाची वाटते. तो अद्याप केवळ 28-29 वर्षाचा आहे. त्याच्यामध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक असून, तो भविष्यातही भारतीय संघासाठी योगदान देईल.
जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. तसेच त्याला आशिया चषक 2022 स्पर्धेसही दुखापतीमुळे मुकावे लागले होते. त्याने दुखापतीनंतर घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळले. मात्र, त्याला परत दुखापत झाली आणि तो महत्वाच्या स्पर्धेस मुकला. त्याच्या जागी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा समावेश केला गेला आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.