रांची। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सुरू असलेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) पार पडला. रांचीच्या जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. यासह त्याने एका खास विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.
रोहित हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात देखील त्याच्या आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने ३६ चेंडूत तब्बल ५ षटकार आणि १ चौकारासह ५५ धावा केल्या. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकारांचा टप्पा पार केला. हा कारनामा करणारा तो जगातील तिसराच फलंदाज ठरला आहे, तसेच भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
यापूर्वी केवळ ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदी यांनी असा कारनामा केला आहे. गेलने सर्वाधिक ५५३ षटकार मारले आहेत, तर ख्रिस गेलने ४७६ षटकार मारले आहेत. रोहितचे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५४ षटकार झाले आहेत. यामध्ये त्याच्या कसोटीमधील ६३ षटकारांचा, वनडेतील २४४ षटकारांचा आणि टी२०मधील १४७ षटकारांचा समावेश आहे. हे ४५४ षटकार रोहितने ३८८ आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि ४०४ डावात पूर्ण केले आहेत.
त्यामुळे रोहित सर्वात जलद ४५० षटकार मारणाराही फलंदाज ठरला आहे. शाहिद आफ्रिदीने ४५० षटकार पूर्ण करण्यासाठी ४८७ डाव खेळले होते. तसेच ख्रिस गेलने ४५० षटकारांसाठी ४९९ डाव खेळले होते.
भारताचा विजय
शुक्रवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंड संघाला भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १५३ धावा केल्या आणि भारताला १५४ धावांचे आव्हान दिले. भारताकडून हर्षल पटेलने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दमदार सुरुवात करताना ११७ धावांची शतकी भागीदारी केली. या दोघांनीही अर्धशतके केली. केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने १७.२ षटकातच ३ विकेट्सच्या मोबदल्यात १५४ धावांचे आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चुका करतो आणि शिकतो’, पदार्पणाच्या सामन्यातच ‘सामनावीर’ ठरलेल्या हर्षल पटेलची प्रतिक्रिया
जिद्दीला मेहनतीची साथ! एकेकाळी मैदानावर कापत होता गवत, आता आहे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख फिरकी अस्त्र