इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता केवळ खेळाडूंमध्येच नाही क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलबद्दलच्या अनेक चर्चांना उधाण आले आहे. अनेक विक्रमांबद्दलही चर्चा होत आहे. प्रत्येक आयपीएल हंगामात अनेक खेळाडू विविध विक्रम करत असतात, त्यामुळे त्याची चर्चा होतच राहते. पण आयपीएलमधील दोन असेही विक्रम आहेत, जे केवळ रोहित शर्माला करता आले आहेत.
रोहितसाठी खास आहे २००९ सालचे आयपीएल
आयपीएल २००९ च्या हंगामात डेक्कन चार्जर्सने विजेतेपद आपल्या नावावर केले होते. हे विजेतेपद डेक्कन चार्जर्सला जिंकून देण्यात रोहित शर्माने मोलाचा वाटा उचलला होता. रोहित आत्ता जरी मुंबई इंडियन्सकडून खेळला असला तरी तो आयपीएलमधील पहिले ३ हंगाम डेक्कन चार्जर्सकडून खेळला आहे.
त्याने २००९ च्या आयपीएल हंगामात १६ सामन्यांत २७.८४ च्या सरासरीने ३६२ धावा केल्या होत्या. तसेच याच हंगामात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध हॅट्रिकही घेतली होती. त्यामुळे एकाच आयपीएल हंगामात ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा आणि गोलंदाजी करताना हॅट्रिक घेणारा रोहित पहिला आणि सध्यातरी एकमेव खेळाडू आहे.
रोहितने २००९ आयपीएल हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात डेक्कन चार्जर्सकडून गोलंदाजी करताना अभिषेक नायर, हरभजन सिंग यांना डावाच्या १६ व्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर बाद केले होते. तर १८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेपी ड्यूमिनीला बाद केले होते आणि हॅट्रिक साजरी केली होती.
रोहितने जिंकले ६ वेळा आयपीएल विजेतेपद
रोहित शर्मा २०१३ पासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत आहे. त्याने या संघाचे यशस्वी नेतृत्व करताना कर्णधार म्हणून १० नोव्हेंबर २०२० ला मुंबई इंडियन्सला पाचवे आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे कर्णधार म्हणून ५ तर खेळाडू म्हणून ६ विजेतीपदं मिळवणारा रोहित एकमेव खेळाडू ठरला होता. याआधी रोहितने २००९ ला डेक्कन चार्जर्सकडून खेळाडू म्हणून पहिले आयपीएल विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर त्याने मुंबईकडून कर्णधार म्हणून ५ विजेतीपदं मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीसोबतच्या फोटोंना भन्नाट कॅप्शन देत जड्डूने जिंकली चाहत्यांची मने
डिव्हिलियर्सने निवडली आयपीएलची ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन, कोहली नाही तर ‘या’ खेळाडूला केले कर्णधार