दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षांखालील विश्वचषक सुरु आहे. या विश्वचषकात 19 वर्षांखालील न्यूझीलंड संघाने काल(29 जानेवारी) 19 वर्षांखालील वेस्ट इंडिज संघाला 2 विकेट्सने पराभूत केले. तसेच उपांत्यफेरीत प्रवेश केला. युवा न्यूझीलंड संघाने मिळवलेल्या या विजयाबरोबरच त्यांचा कर्णधार जेसी ताशकोफ आणि जॉय फील्ड या खेळाडूंनी या सामन्यादरम्यान दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
ताशकोफ आणि फिल्ड यांनी या सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजचा दुखापतग्रस्त फलंदाज किर्क मॅकेन्झीला 99 धावांवर बाद झाल्यानंतर उचलून मैदानाबाहेर नेले. त्यांनी दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीबद्दल भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने कौतुक केले आहे.
https://twitter.com/cricketworldcup/status/1222568945204498433
या सामन्यात झाले असे की प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजचा फलंदाज किर्क मॅकेन्झीला 43 व्या षटकाच्या अखेरीस उजव्या पायाला क्रॅम्प आला. त्यामुळे तो 99 धावांवर असताना रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. पण वेस्ट इंडिजची 9 वी विकेट गेल्यावर तो पुन्हा मैदानावर आला. मैदानावर पुन्हा आल्यानंतर तो पहिलाच चेंडू खेळताना क्रिस्तिन क्लार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
मात्र बाद झाल्यानंतर तो पुन्हा मैदानातून बाहेर जाताना संघर्ष करत असल्याचे पाहून न्यूझीलंडचा कर्णधार ताशकोफ आणि फील्ड हे युवा क्रिकेटपटू पुढे आले. त्यांनी दुखापतग्रस्त मॅकेन्झीला उचलून घेतले आणि मैदानाबाहेर नेले.
या घटनेचा व्हिडिओ आयसीसीच्या विश्वचषकाच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ रिट्विट करताना रोहितने म्हटले आहे की ‘अशी खिलाडूवृत्ती पाहून चांगले वाटले.’
https://twitter.com/ImRo45/status/1222750559393837057
तसेच न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमनेही या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले आहे.
https://twitter.com/Bazmccullum/status/1222711847045853184
या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 238 धावा केल्या होत्या. न्यूझीलंड संघाकडून क्लार्कने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच ताशकोफ आणि फिल्ड दोघांनी गोलंदाजी करताना चमकदार कामगिरी करताना प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजी करतानाही क्लार्क आणि फिल्डने 9 व्या विकेटसाठी नाबाद 86 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. क्लार्कने नाबाद 46 तर फिल्डने नाबाद 38 धावा केल्या. मात्र कर्णधार ताशकोफला फलंदाजी करताना केवळ 6 धावाच करता आल्या.





