…आणि चाहत्यामुळे चालू सामन्यात रोहित शर्माचा गेला तोल

पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आज(12 ऑक्टोबर) तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचा चाहता सुरक्षा रक्षकांना चूकवून मैदानात आला होता.

ही घटना आजच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच घडली. यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून वर्नोन फिलँडर आणि फाफ डू प्लेसिस फलंदाजी करत होते. तर क्षेत्ररक्षणासाठी स्लीपमध्ये रोहित उभा होता.

पण त्यावेळी अचानक एक चाहता रोहितच्या दिशेने मैदानात आला आणि रोहितचे पाय धरु लागला. त्यामुळे रोहितचा तोल जाऊन तो या चाहत्याच्या अंगावर पडला. अखेर सुरक्षारक्षकांनी या चाहत्याला मैदानाबाहेर नेले.

या घटनेमुळे भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्करांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सुरक्षा रक्षकांवर टीका केली आहे आणि म्हटले आहे की सुरक्षारक्षकांनी सामना पाहण्यापेक्षा प्रेक्षकांकडे लक्ष दिले पाहिजे.

याआधीही भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी दरम्यान एक चाहता विराट कोहलीशी हात मिळवण्याच्या इच्छेने मैदानात घूसला होता. तसेच त्याआधी मोहालीला पार पडलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या टी20 सामन्यादरम्यानही एक चाहता मैदानात आला होता.

सध्या पुण्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 275 धावा केल्या आहे. त्यामुळे भारताने पहिल्या डावात तब्बल 326 धावांची आघाडी घेतली आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कर्णधार फाफ डूप्लेसिसने 64 धावांची तर केशव महाराजने 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच वर्नोन फिलँडरने नाबाद 44 धावा केल्या. भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच उमेश यादवने 3, मोहम्मद शमीने 2 आणि रविंद्र जडेजाने 1 विकेट घेतली.

You might also like