रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ सध्या चांगले प्रदर्शन करतो आहे. नुकताच भारतीय संघाने वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. यानंतर आता भारतीय संघाने लखनऊ येथे श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात (First T20I Match) एकतर्फी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने ६२ धावांनी हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकत कर्णधार रोहितने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहितने श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी२० सामना (IND vs SL) जिंकत एक असा विश्वविक्रम (Captain Rohit Sharma’s World Cup) केला आहे, जो क्रिकेटविश्वातील कोणताही कर्णधार करू शकलेला नाही.
रोहितने केला विश्वविक्रम
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितचा कर्णधार म्हणून भारतातील हा १६ वा सामना होता. यातील १५ टी२० सामने रोहितने जिंकले आहेत. एकंदरित रोहितने कर्णधार म्हणून घरच्या मैदानावर (Most T20I Win At Home) फक्त एकच सामना गमावला आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील पहिलाच कर्णधार आहे.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने घरच्या मैदानावर १३ टी२० सामने जिंकले होते, तर ९ सामने गमावले होते. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णदार ऑएन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांनी त्यांच्या मायदेशात १५ टी२० सामने जिंकलेले आहेत. परंतु हे सामने जिंकण्यासाठी त्यांनी रोहितपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. मॉर्गनने इंग्लंडमध्ये २५ टी२० सामन्यात संघाचे नेतृत्त्व करताना १५ विजय मिळवले आहेत. तर विलियम्सनने ३० सामने खेळताना १५ विजयांची नोंद केली आहे.
रोहितच्या नेतृत्त्वात भारतीय संघाचा २२वा विजय
एकूण कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, कर्णधार रोहितचा हा २२ वा टी२० सामना विजय होता. त्याने आतापर्यंत २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व केले आहे. यातील २२ सामने त्याने संघाला जिंकून दिले आहेत. तर केवळ ४ सामने गमावले आहेत.
तसेच श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघाचा हा पाचवा टी२० विजय होता. याशिवाय भारतीय संघाचा हा सलग १० वा टी२० विजय होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधाराचा ‘हा’ सल्ला आला कामी, इशानने श्रीलंकेविरुद्धच्या ८९ धावांच्या खेळीचे श्रेय दिले रोहितला