आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा (एमआय) पुढील सामना गुरूवारी (१६ एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध आहे. याआधी मंगळवारी (१४ एप्रिल) एमआयच्या खेळाडूंनी नेटमध्ये सराव केला. या सराव सत्रावेळी रोहित शर्मा कुठेही दिसला नाही. यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी त्याच्या फिटनेस आणि उपलब्धतेबाबत शंका निर्माण झाली आहे.
रोहितला रविवारी (१२ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. एमआय त्या सामन्यात २४१ धावसंख्येचा पाठलाग करत होता. त्यावेळी रोहित १३ चेंडूत १९ धावा करत रिटायर-हर्ट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या सामन्यानंतर त्याचे स्कॅन करण्यात आहे आणि त्यामध्ये त्याचे स्नायू फाटल्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत, मात्र एक खबरदारी म्हणून रोहितला पुढच्या सामन्यासाठी आराम दिला जाऊ शकतो.
पंजाब विरुद्ध रोहित खेळणार की नाही हे निश्चित नसताना तो आणखी सामन्यांना मुकण्याची शक्यता फारच कमी आहे. ‘तसे पाहिले तर हॅमस्ट्रिंगची दुखापत गंभीर असते, मात्र रोहित अधिक काळ संघाबाहेर राहणार याचे काही ठोस पुरावे नाहीत. संघ व्यवस्थापक मात्र कोणतीही जोखीम घेण्याआधी नीट विचार करेल,’ असे क्रिकबजच्या अहवालात म्हटले आहे.
‘सामना खेळायचा की नाही, हा अंतिम निर्णय मोठ्या प्रमाणात रोहितवरच अवलंबून आहे. त्याचा अनुभव पाहता संघ त्याच्या निर्णयाबाबत योग्य विचार करेल, तसेच त्याची दुखापत अधिक गंभीर होऊ नये याचीही खात्री संघ व्यवस्थापक घेतील,’ असेही त्या अहवालात सांगितले आहे.
रविवारच्या सामन्यात रोहितने एमआय फ्रॅंचायजीसाठी ६००० धावा पूर्ण केल्या. याबरोबर तो एमआयसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने आतपर्यंत २३१ सामने खेळला आहेत. त्यामध्ये २९.७६ च्या सरासरीने आणि १३२.८२ च्या स्ट्राईक रेटने ६०१३ धावा केल्या आहेत. यामध्ये ४० अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत मुंबईवरचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. रोहित डावाची सुरूवात रायन रिकल्टनसोबत उत्तम करतो, त्यामुळे संघाला सुरूवातीलाच गती मिळते. तसेच तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांचा फलंदाजी फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. यातच रोहित जर पंजाब विरुद्ध खेळला नाही तर संघ अधिक अडचणीत येईल.
रोहितने सरावसत्रात भाग न घेणे हे कदाचित दिशाभूल करणारे असेल आणि तो पंजाब विरुद्ध खेळेल अशी आशा मुंबईचे चाहते करत असतील.





