कोलकाता। वेस्ट इंडिज संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिका पार पडली असून बुधवारपासून टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या टी२० मालिकेत ३ सामने खेळवले जाणार आहेत. ही संपूर्ण मालिका ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (१६ फेब्रुवारी) पार पडला. भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ६ गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ मालिकेत १-० असा आघाडीवर आला. त्याचवेळी या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात जाताच भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक खास विक्रम आपल्या नावे जमा केला.
रोहितने टाकले हफीजला मागे
मालिकेतील पहिल्या सामन्यात मैदानावर उतरताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानी आला. हा रोहितचा १२० वा टी२० सामना होता. त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हफिज याला मागे सोडले. हफीजने आपल्या कारकीर्दीत ११९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले होते. या यादीमध्ये पहिल्या स्थानी पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिक हा आहे. मलिकने आतापर्यंत १२४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.
भारतीय संघाने जिंकला पहिला सामना
टी२० मालिकेतील या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने निकोलस पूरन याच्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारित २० षटकात १५७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्माच्या वेगवान ४०, ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर भारतीय संघाने सहा गडी राखून सामन्यात विजय संपादन केला.
महत्वाच्या बातम्या–
भारतीय दिग्गज म्हणतोय, “सनरायझर्समध्ये विलियम्सन बनणार बळीचा बकरा” (mahasports.in)